BSF ची मोठी कारवाई, हिंदुस्थानात बेकायदेशीर घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी घुसखोराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) पुन्हा एकदा पाकिस्तानचा नापाक कट उधळून लावला आहे. सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला बीएसएफच्या जवानांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर जवानांना एका व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसली. हा घुसखोर पाकिस्तानी सीमेकडून हिंदुस्थानी हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. बीएसएफच्या जवानांनी त्याला तात्काळ थांबण्याचा इशारा दिला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांनी योग्य ती कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

या घुसखोराकडून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत का, याची चौकशी सध्या सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि सीमाभागात वाढत्या हालचाली पाहता, संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीएसएफने या घटनेनंतर शोध मोहीम अधिक तीव्र केली असून सीमा सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.