
>> विनायक
यंदा थंडी जरा जास्तच आहे किंवा उन्हाळा जास्त वाटतो… वगैरे वाक्यं त्या त्या ऋतुमानात कानी पडतातच. असं वाटणं सापेक्ष असतं. त्याच वेळी ‘पूर्वी काय थंडी पडायची! दाट धुक्याच्या चादरीमुळे दहा फुटांवरचंसुद्धा दिसत नसे’ असे ‘जुने’ अनुभव सांगणारे जाणतेही असतात. काही वर्षांपूर्वी (म्हणजे चाळीसेक) थंडीचा कडाका जास्त जाणवायचा हे खरंच. त्यावेळचं धुकं… धुकंच असायचं. त्याचं ‘धुरकं’ झालेलं नव्हतं. आता आमच्या मुंबईतल्या घराच्या सातव्या मजल्यावरून प्रभातसमयी दूरवर ‘धुरक्या’ची दाट लाटच दिसते, ती श्वास घेताना जाणवते. याचं कारण, दिवसभर धूर ओकणारी वाहने, कारखान्यातील रसायनं, बांधकामांची धूळ, सिमेंटमिश्रीत धूळ या सगळय़ाचे हवेबरोबर दिवसा ‘वर’ गेलेले सूक्ष्मकण एकत्रित होऊन पहाटे थंडीने हवेच्या खालच्या थरात ‘सेटल’ होतात. परिणामी धुक्याचा आभास निर्माण करणारं ‘धुरकं’ व्यापून टाकत असतं. जगातल्या बहुतेक महानगरांची हीच अवस्था. त्यापासून दूर गेलं की स्वच्छ शीतल धुक्याचा रम्य अनुभव येऊ शकतो.
मूळ मुद्दा थंडीचा. थंडी पडणं हे पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षांशी असलेल्या साडेतेवीस अंशाच्या कोनात आणि सूर्याभोवतीच्या भ्रमणात असतं. यामुळेच सूर्य दक्षिण गोलार्धावर ‘गेला’ की आपल्याला थंडीची जाणीव होऊ लागते. ही प्रक्रिया सप्टेंबर अखेरीपासून सुरू झाली तरी थंडीची चाहुल नोव्हेंबरच्या सुरुवातीला लागते. तेव्हापासून ते परंपरेने अनुभवजन्य निरीक्षणातून थंडी होळीपर्यंत टिकते. म्हणजे मार्च अखेरपर्यंत. एप्रिल सुरू झाला की थंडीचा कडाका संपून उन्हाळय़ाची कडकी हैराण करू लागते.
या वर्षीच्या, म्हणजेच 2025-26 च्या थंडीचा विचार करायचा तर सध्या वातावरण थंड आहे. त्याचं एक कारण आहे, ‘क्षीण ला-निना’ परिणाम. त्यामुळे वाऱयांचे झोत उत्तर गोलार्धात ढकलले जाऊन, थंडीच्या लाटा येऊ लागतात. हवामान शीतल होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ‘पोलर व्होर्टेक्स.’ यामध्ये काय होते की, पृथ्वीच्या ध्रुवीय भागांमध्ये अतिशीत हवेचे भोवरे घडय़ाळाच्या काटय़ांच्या उलट दिशेने भोवऱयासारखे गरगरू लागतात. त्याचेही झेपोस्फेरिक म्हणजे वातावरणाच्या खालच्या भागातील आणि स्टॅटोस्फेरिक म्हणजे वातावरणाच्या वरच्या भागातील वाऱयांचे भोवरे असे प्रकार असतात.
यामुळे अनेकदा अभूतपूर्व गारवा पडतो. हिमवृष्टीत वाढ होते आणि हे वारे ती शीतलहर घेऊन पृथ्वीभर पसरतात. सध्याच्या काळात उत्तर ध्रुवीय थंडीचा परिणाम आपल्याला जाणवू शकतो.
या वर्षी क्षीण ला निना आणि ध्रुवीय वात-भोवरे यांच्या संयोगाने हिंदुस्थानातली थंडी वाढत आहे. थंडी थोडीशी कमी होतेय असं वाटेपर्यंत दोन-चार दिवस पुन्हा थंडीच्या लाटा येत आहेत. आपल्या देशात याचा अधिक परिणाम उत्तर आणि पूर्व भागात जाणवतोय. त्यामुळे राजस्थानात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला, तर राजधानी दिल्लीमध्ये तो तीन अंशापर्यंत घसरला.
थंडी बेताची असली तर ती हिवाळी पिकांना मानवते. सध्या बाजारात हरभरा, मटार, संत्री, गाजर मोठय़ा प्रमाणात दिसतायत. परंतु सारखं धुकं पडलं किंवा हिमवर्षाव होऊ लागला तर द्राक्षासारख्या नाजुक पिकांचं नुकसानही होऊ शकते.
हे ध्रुवीय शीतवात भोवरे किंवा ‘पोलर व्होर्टेक्स’ तेवढय़ा भागापर्यंत मर्यादित राहिले तर ठीक. त्यामुळे सुखद थंडीचा अनुभव अन्यत्र येत असतो. पण, वातावरणीय बदल, वाढतं प्रदूषण अशा अनेक गोष्टींमुळे या भोवऱयांचं चक्र भंग पावलं तर मात्र त्याचा परिणाम ध्रुवीय भागांकडून खालच्या भागांकडे शीतलहरी पसरण्यात होतो.
एरवी थंडी, तशी सुखदच. स्वेटर, मफलरचा वापर या काळात वाढतो. शाल पांघरून सकाळी किंवा संध्याकाळी फेरफटका मारणाऱयांची संख्याही वाढते. चविष्ट गरम पदार्थांवर ताव मारता येतो. उन्हाळय़ापेक्षा थंडीचा मोसम व्यायामासाठीही उत्तम असतो. भूक छान लागते. पर्यटन वाढतं वगैरे.
मात्र असा हा शीतकाल आरोग्यदायी असला तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अर्धशतकापूर्वी थंडी खरोखरच सुखद असायची. गेल्या पंचवीस वर्षांत प्रदूषणाच्या वाढत्या पातळीने थंडीच्या काळात सर्दीसारखे विकार किंवा क्वचित न्यूमोनिया होणं या गोष्टी अनेकांना अनुभवाला येतायत.
हिवाळय़ाची मजा घ्यायची तर दूर निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवं. ऊबदार कपडे असले की मैलोगणती पायपीट केली तरी दमायला होत नाही आणि आपोआप व्यायाम घडून प्रकृतीही सुधारते. थोडक्यात काय, जागतिक महानगरांमधल्या मंडळींना हिवाळय़ाच्या काळात केवळ सुखद नव्हे, तर आरोग्यदायी थंडीच्या शोधात जावं लागतं. या वर्षी हिवाळा जास्त टिकणार म्हणतात. तेव्हा सुखावह थंडीच्या प्रदेशात जाता येतं का पहा.





























































