
शहरातील गंभीर प्रदूषणाची समस्या ‘जैसे थे’ असतानाच रविवारी प्रदूषणाला उकाडय़ाने तडका दिला आणि मुंबईकरांची प्रचंड दमछाक झाली. मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक 180च्या वर म्हणजेच ‘खराब’ नोंदवला गेला. यातच तापमानाने अचानक 35 अंशांची उच्चांकी पातळी गाठली. सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात तब्बल 4 अंशांची मोठी वाढ झाली. सकाळपासून वाढलेला उकाडा आणि दिवसभर हवेत स्थिरावलेले प्रदूषण अशा वातावरणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
शहर आणि उपनगरांतील प्रदूषण नियंत्रणात आणण्यात पालिका व इतर सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या आहेत. रविवारी शहराच्या अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 175 अंकांच्या आरोग्याला घातक श्रेणीत नोंद झाला. कुलाब्यातील न्यू नेव्ही नगरमध्ये अत्यंत घातक पातळीचे प्रदूषण नोंद झाले. या भागातील एक्यूआय सर्वाधिक 191 अंकांच्या पातळीवर होता. याचदरम्यान शहराचे कमाल तापमान 35 अंशांच्या घरात गेले. संपूर्ण शहरभर फैलावलेल्या प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची प्रचंड घुसमट झाली. विशेषतः दक्षिण मुंबईत प्रदूषणाचे गंभीर चित्र होते. धुरक्यामुळे अगदी काही अंतरावरील दिसेनासे झाले होते. त्यात उकाडय़ात अचानक मोठी वाढ झाल्याने सुट्टीत फिरायला गेलेले मुंबईकर घामाघूम आणि दमछाक होऊनच घरी परतले. कुलाब्यात 34 अंश, तर सांताक्रूझमध्ये 35 अंश तापमानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी कमाल तापमान 4 अंशांनी वाढले. तसेच सकाळचे तापमान 20 अंशांवर पोहोचले. पुढील आठवडाभर तापमानवाढ कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सात वर्षांतील सर्वाधिक प्रदूषण
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच 191 अंकांवर पोहोचलेले प्रदूषण मुंबईतील मागील सात वर्षांच्या फेब्रुवारीतील सर्वाधिक प्रदूषण ठरले आहे. शहरातील न्यू नेव्ही नगर, हिंदू कॉलनी, माऊंट मेरी, मोमिन नगर, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, जुहू तारा, चेंबूर, आरामनगर, शिवडी पश्चिम, वडाळा ट्रक टर्मिनल या भागांत आरोग्याला घातक ठरणारे प्रदूषण नोंद झाले. सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 157 व्या स्थानी असलेल्या मुंबईतील प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे.






























































