
टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका कॅनडासमोर उतरत असली तरी कर्णधार एडन मारक्रमच्या चेहऱ्यावर ‘हे सहज आहे’ असा भाव अजिबात नव्हता. उलट आजकाल कोणताही सामना हलका नसतो असा संदेश देत मारक्रमने आधीच सावधगिरीचा झेंडा फडकावला आहे.
ब गटातील पहिल्या लढतीआधी बोलताना मारक्रम म्हणाला, गेल्या दोन दिवसांत जे काही सामने झाले ते पाहिले की पुणालाही हलक्यात घेण्याची हिंमत होत नाही. क्रिकेट आता सगळ्यांसाठी सारखंच कठीण झालं आहे. म्हणजे थोडक्यात काय, ‘मोठे’ आणि ‘लहान’ असा फरक आता फक्त नावापुरताच उरला आहे.
आम्हाला स्पर्धेची सुरुवात सकारात्मक करायची आहे. अशा मोठय़ा स्पर्धेत पहिले पाऊल नीट पडलं तर पुढचा प्रवास सुकर होतो. संघ म्हणून आम्ही याच गोष्टीवर लक्ष पेंद्रीत केलेय.आत्मविश्वास आहे, पण अहंकार नाही, असा सूर मारक्रमच्या बोलण्यातून जाणवत होता.
कॅनडाच्या संघातही अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. दिलप्रीत बाजवाच्या नेतृत्वाखाली मूळ हिंदुस्थानचाच संघ भिडेल. कॅनडाला दोन्ही सराव सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला असला तरी इटलीविरुद्ध 23 चेंडूंतील 33 धावांची खेळी खेळत युवराज सामराने आपल्या ताकदीची झलक दाखवली. तो अद्याप पूर्ण सदस्य राष्ट्राविरुद्ध एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही, मात्र त्याच्याकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे.
संभाव्य अंतिम संघ
कॅनडा – दिलप्रीत बाजवा (कर्णधार), युवराज समरा, नवनीत धालीवाल, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्हा, पंवरपाल तथगुर (यष्टिरक्षक), जसकरण सिंग, साद बिन झफर, शिवम शर्मा, डिलन हेइलिगर, कलीम सना.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डीकॉक (यष्टिरक्षक), एडन मारक्रम (कर्णधार), रायन रिकल्टन, डिवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स किंवा जेसन स्मिथ, मार्को यान्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, एनरिक नार्किया, लुंगी एनगिडी.

























































