
तेलंगणातील ‘कुत्रामुक्त गाव’ मोहिमेच्या नावाखाली तब्बल 1600हून अधिक कुत्र्यांना मारले आहे. आंध्र प्रदेशातील डॉग कॅचर्सकडून विषारी इंजेक्शन घेत हे कृत्य केले. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील बाराहून अधिक गावांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1600हून अधिक कुत्रे मारल्याचे आरोप समोर आले आहेत.
तेलंगणातील गावांमध्ये कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना वाढल्याने डिसेंबरमध्ये झालेल्या सरपंच निवडणुकीत हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित झाला. अनेक लोकप्रतिनिधींनी ‘कुत्रा मुक्त गाव’ बनवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गावातून कुत्रे गायब होऊ लागले. गावाबाहेर सामूहिक कबरी सापडल्या, तेव्हा संशय वाढला. तपासात हे स्पष्ट झाले की, हे सर्व सुनियोजित पद्धतीने केले गेले होते.
आरोप आहे की, आंध्र प्रदेशातून डॉग कॅचर्सना बोलावले आणि प्रती कुत्र्यामागे 500 रुपये दराने विषारी इंजेक्शन देण्यात आले. हनुमानकोंडा जिल्ह्याच्या श्यामपेट आणि अरपेल्ली गावांमध्ये 300 कुत्र्यांच्या हत्येची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कामारेड्डी जिल्ह्याच्या वाडी, फरीदपेट, बंदारमश्वेरपल्ली, भवानीपेट आणि पलवनचा गावांमध्ये 200 कुत्रे मारले गेले. जगित्याल जिल्ह्यात धर्मपुरी परिसरात 30, पगडापल्ली गावात 300, रंगारेड्डी जिल्ह्याच्या याचरममध्ये 140, निर्मल जिल्ह्यात 200 कुत्रे मारल्याचा आरोप आहे.
स्ट्रे ऑनिमल फाउैंडेशन ऑफ इंडियाच्या अधिकारी मुदावथ प्रीतीने सांगितले की, विषारी इंजेक्शनचा गैरवापर मानवांसाठी गंभीर आरोग्य संकट निर्माण करू शकतो. पोलिसांनी सर्व मृतदेह जप्त केले नाहीत. वास्तविक संख्येपेक्षा कमी आकडेवारी नोंदवली. संस्थेने राज्य सरकारकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.



























































