‘मुंबई पुष्पोत्सवा’ला तब्बल दीड लाख मुंबईकरांनी दिली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात सलग तीन दिवस सुरू असलेल्या मुंबई पुष्पोत्सवास तब्बल दीड लाख मुंबईकरांनी भेट दिली. रविवारी या पुष्पोत्सवाचा समारोप झाला. विविधरंगी फुलांनी सजविलेली संगीत विश्वातील वाद्य पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई पुष्पोत्सवाला नागरिक आणि पर्यटकांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला. विविध वेली, मसाल्याची रोपे शोभेची फुलं आदी सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधले. फळे व फुलं भाज्यांची रेलचेल अनुभवण्यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी अनेकांनी गर्दी केली. दरवर्षी मुंबई पुष्पोत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो.

यंदाच्या पुष्पोत्सवात संगीत विश्वातील विविध वाद्यांची प्रतिकृती विविधरंगी पाना-फुलांनी साकारण्यात आली. यामध्ये रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीतून बासरी, तबला, वीणा, सतार, मृदुंग, गिटार, पेटी, टाळ, सनई, तुतारी, सॅक्सोपह्न यासारखी संगीत वाद्ये साकारण्यात आली होती. तीनही दिवसात मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक आदींनी देखील भेट दिली.