
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलण्यापासून रोखले जाते, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधक करत आहे. त्यातच सोमवारी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यात आल्याने लोकसभेत गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे आणि अर्थसंकल्पावरील चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सभागृहात गदारोळ सुरू राहिला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी असा दावा केला की, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्पीय चर्चेपूर्वी त्यांना बोलण्याची परवानगी देण्याचे वचन दिले आहे.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या विधानाला विरोध केला आणि म्हटले की सभापतींनी गदारोळ थांबून कामकाज सुरू होण्यासाठी बैठक बोलावली होती. राहुल गांधीही तिथे उपस्थित होते. त्यावेळी अध्यक्ष म्हणाले की, यामुळेच समस्या सुटत असेल तर तसे होऊ द्या. मात्र, त्यांनी कोणतेही आश्वासन दिले नव्हते.
राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना भेटण्यासाठी सुमारे एका तासापूर्वी त्यांच्या दालनात गेलो होतो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे. अर्थसंकल्पीय चर्चेपूर्वी त्यांनी आम्हाला बोलण्याची परवानगी देण्याचे वचन दिले आहे. किरण रिजिजू यांनी आक्षेप घेतला आणि म्हटले की, राहुल गांधी जे बोलत आहेत ते पूर्णपणे बरोबर नाही. अध्यक्षांनी अर्थसंकल्पीय चर्चा सुरू होण्यापूर्वी बोलण्याची परवानगी देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार तुम्ही मला बोलण्याची परवानगी दिली तर मी माझे मुद्दे मांडू का? पीठासीन अध्यक्षा संध्या राय यांनी सांगितले की, त्यांना अशी कोणतीही सूचना मिळाली नाही. सूचना न देता बोलण्याची परवानगी देता येत नाही.
पीठासीन अध्यक्षा संध्या राय यांनी त्यांना फक्त अर्थसंकल्पावर बोलण्यास सांगितले. विरोधी पक्षनेते भूमिकेवर कायम राहिले आणि गोंधळाला सुरुवात झाली. गदारोळ वाढत गेल्याने अध्यक्षांनी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केले.

























































