अध्यक्षांचे पद हे निष्पक्ष असावे, तुम्ही भाजपच्या दबावाखाली काम करत आहात, काँग्रेस महिला खासदारांचे ओम बिर्ला यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेतील गदारोळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहातील अनुपस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक खरमरीत पत्र लिहून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “तुम्ही सत्ताधारी भाजपच्या सततच्या दबावाखाली काम करत आहात,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

नुकतेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका विधानात म्हटले होते की, काँग्रेसचे काही खासदार पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन काही अघटित घडवू शकतात, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधानांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिला होता. अध्यक्षांच्या या विधानावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे.

महिला खासदारांचे पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:

१. अध्यक्षांनी महिला खासदारांवर केलेले आरोप हे खोटे, निराधार आणि बदनामीकारक असल्याचे पत्रात म्हटले आहे.

२. “पंतप्रधान सभागृहात आले नाहीत, कारण त्यांच्या मनात भीती होती, आमच्याकडून त्यांना कोणताही धोका नव्हता. ते विरोधकांना सामोरे जाण्यास घाबरत आहेत,” असा पलटवार खासदारांनी केला आहे.

३. अध्यक्षांचे पद हे निष्पक्ष असावे, परंतु सध्या ते भाजपच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

४. संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर सदस्यांना बोलू दिले जात नाही, असा दावाही महिला खासदारांनी केला आहे.