खेड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत खेड तालुक्यात शिवसेनेला मतदारांनी भरभरून मते देत मशाल हाती घेतली आहे. पंचायत समितीत पुर्ण बहुमतानिशी भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला असून, जिल्हा परिषदेच्या आठपैकी पाच जागांवर मशालीने वर्चस्व राखले आहे.

खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होताच तालुक्याच्या राजकारणात मोठा आणि निर्णायक बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक शिवसेना आमदार बाबाजी काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासाठी प्रतिष्ठsची ठरली होती. मात्र निकालानंतर तालुक्यातील सत्ता-समीकरण आमदार बाबाजी काळे यांच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

खेड तालुक्यातील एकूण 8 जिल्हा परिषद गटांपैकी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 5 गटांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 गटांवर उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे जिल्हा परिषदेत शिवसेनेची ताकद वाढली असून आमदार बाबाजी काळे यांचे तालुक्यातील राजकीय नेतृत्व अधिक भक्कम झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात ‘मशाल’ चिन्हाला मिळालेल्या मोठय़ा जनसमर्थनामुळे शिवसेनेने निर्णायक आघाडी घेतली आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

पक्षीय बलाबल
– शिवसेना – 9 – राष्ट्रवादी – 6 – शिंदे गट – 1