कोकण बोर्डात बारावीसाठी 15 हजार 713 व दहावीसाठी 17 हजार 449 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोंकण विभागीय मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून इयत्ता बारावी करीता १५ हजार ७१३ तर इयत्ता दहावी करीता १७ हजार ४४९ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. शैक्षणिक वर्ष सन २०२५-२०२६ साठी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा ०२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.

कोंकण विभागीय मंडळाच्या अंतर्गत जिल्ह्यामध्ये बारावीची परीक्षा ३८ तर दहावीची परीक्षा ७३ केंद्रांवर घेतली जाणार आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा जिल्ह्यातील बारावीसाठीच्या 2 तर दहावीसाठीच्या 4 परीक्षा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी व मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. संदिप शिर्के मो.क्र. 9552064640, एन.एस.पाटील 9405332930, भाग्यविधाता वारंग 9423213240, भिमराव येडगे 9421074589 यांना मदतीची आवश्यकता भासल्यास संपर्क साधावा.

कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जे परीक्षार्थी परीक्षागृहात अथवा परीक्षा केंद्रपरिसरात कॉपी करताना आढळतील अथवा अन्य स्वरूपाचा गैरप्रकार करताना आढळतील त्यांच्याविरुध्द मंडळ अधिनियमानुसार व महाराष्ट्र प्रिव्हेनशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट १९८२ नुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच गैरमार्ग करणारे, गैरमार्गास मदत करणारे आणि गैरमार्गास उत्तेजन देणारे यांच्याविरुध्द दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येतील. परिक्षेकरीता कोकण विभागासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकात जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्य.) दिपक मेंगाने, शिक्षणाधिकारी (प्राथ.) चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी (माध्य.) प्रदीप पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य निता कांबळे, महिला भरारी पथकामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता दिपा सावंत यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हास्तरावरूनही विविध विभागांची भरारी पथके व बैठी पथके नेमण्याबाबत आली आहेत.

चालू वर्षी जिल्हास्तरीय दक्षता समितीचे पुर्नगठन करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथ.), शिक्षणाधिकारी (योजना) यांचा समितीमध्ये समावेश आहे.