
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या दहाव्या सामन्यात नेदरलॅण्ड्सने नामिबियावर 7 विकेट्सनी मात करीत स्पर्धेत विजयाची बोहणी केली. गट ‘अ’ मधील या लढतीत 157 धावांचे आव्हान नेदरलॅण्ड्सने 18 षटकांत 3 गडी गमावून यशस्वीरीत्या पार केले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 20 षटकांत 8 गडी बाद 156 धावा केल्या. नामिबियाकडून निकोल लोफ्टी-ईटनने 42, जॉन फ्रायलिंकने 30, तर जेजे स्मिटने अवघ्या 15 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. नेदरलॅण्ड्सकडून लोगान व्हॅन बीक आणि बास डी लीडे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. आर्यन दत्त आणि फ्रेड क्लासेन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला. विलेम मायबर्ग व रूबेन ट्रम्पेलमन धावचीत बाद झाले.
नामिबियाकडून मिळालेले 157 धावांचे नेदरलॅण्ड्सने 18 षटकांत 3 बाद 159 धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून बास डी लीडेने 48 चेंडूंमध्ये 72 धावांची झुंजार खेळी केली. कर्णधार स्का@ट एडवर्ड्स 18 धावांवर नाबाद राहिला. कॉलिन अॅकरमनने 32, तर मायकेल लेविटने 28 धावांचे योगदान दिले. नामिबियाकडून बर्नार्ड स्कोल्झ, रुबेन ट्रम्पेलमन व जॅन निकोल लॉफ्टी-ईटन यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

























































