
बांगलादेशात गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या अवघ्या 48 तास आधी मैमनसिंह जिल्ह्यातील त्रिशाल उपजिह्यात एका हिंदू व्यापाऱयाची हत्या करण्यात आली. सुशेन चंद्र सरकार, वय 62 वर्षे असे व्यापाऱ्याचे नाव आहे. ते त्रिशालमध्ये ‘मेसर्स भाई-भाई एंटरप्रायजेस’ नावाने व्यवसाय करत होते. हल्लेखोरांनी हत्येनंतर दुकानातील रक्कम लुटून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बोगर बाजार चौकात हल्लेखोरांनी सुशेन सरकार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी दुकानाचे शटर बाहेरून बंद करून पळ काढला. बराच वेळ झाला तरी सुशेन घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने मैमनसिंह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

























































