
अपघात रोखण्यासाठी परिवहन विभाग आता ‘ऍक्शन मोड’वर आला आहे. राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने राज्य सरकारच्या विविध यंत्रणांचे अपयश उजेडात आले. त्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली आणि अधिकाऱयांना अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या. राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपघात रोखण्याच्या दृष्टीने महामार्गांवरील अपघातप्रवण ठिकाणांची माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे अशा उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.

























































