
मोखाडा-खोडाळा-विहीगाव या राज्य महामार्गावरील गारगाई नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा कठडा तुटल्याने ‘नजर हटी दुर्घटना घटी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघाताच्या भीतीने वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत स्थानिकांसह वाहनचालकांनी अनेकदा आवाज उठवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यावर अधिकाऱ्यांना जाग येणार का, असा सवाल विचारला जात आहे.
मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा तसेच मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाला जोडणारा मोखाडा-खोडाळा-विहीगाव हा राज्य महामार्ग आहे. या मार्गावरील गारगाई नदीवर ब्रिटिशकालीन बांधणीचा पूल आहे. या पुलावरून दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी तसेच वाहनांची रहदारी असते. जवळपास ३० मीटर लांब व २५ मीटर खोलीचा अरुंद स्वरूपाचा पूल आहे. अरुंद पूल असल्याने येथून दोन वाहने एकाच वेळेस जाऊ शकत नाही. पुलाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे पुलावरील कठडा तुटला आहे. त्यामुळे येथून जाताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही.
स्थानिक मदतीला धावतात
गेल्या वर्षी याच पुलाच्या तुटलेल्या कठड्यावरून जोगल वाडी येथे राहणारा योगेश सारकते हा तरुण दुचाकीसह २५ फूट खोल दरीत कोसळला होता. दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. त्याच्या हातापायाला, डोक्याला व जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतरही या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. एखादा अपघात झाल्यास शेळकेवाडी येथील स्थानिक मदतीला धावतात.

























































