
दृष्टी कमी झाल्याने एका २७ वर्षीय तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. कार्तिक शेट्टी असे मृत तरुणाचे नाव आहे.
कार्तिक याला गेल्या काही दिवसांपासून कमी दिसू लागले होते. या शारीरिक व्याधीमुळे तो प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. याच नैराश्यातून त्याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी भाईंदर (पश्चिम) येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

























































