
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था आयोजित शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ सहकार तज्ञ आणि साहित्यिक डॉ.तानाजीराव चोरगे भूषवणार आहेत.संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण,कृषी आणि सहकार हे विषय घेऊन आयोजित केलेले पहिलेच संमेलन असल्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मांडकी -पालवण येथे साहित्य संमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्थानिक कवींचे संमेलन, ग्रामीण साहित्यातील कोकण याविषयावर परिसंवाद, ग्रामीण साहित्य काल, आज आणि उद्या याविषयावर परिसंवाद, ग्रामीण कथाकथन, सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी याविषयावर चर्चासत्र, ग्रामीण कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी साहित्य व शेती सुधारणा याविषयावर परिसंवाद, सहकार विषयी मुलाखत, आता आत्महत्या थांबवूया या विषयावर परिसंवाद होणार आहे. त्याचबरोबर प्रयोगशील शेतकऱयांची यशोगाथा सांगितली जाणार आहे. दुपारी 3 वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

































































