
अहिल्यानगर शहरात कायद्याचं राज्य उरल आहे का? असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ आता अहिल्यानगरकरांवर आली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहराच्या मध्यवर्ती भागात 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अकबर नामक तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरात प्रचंड तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मुकुंदनगर परिसरातील जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. हल्लेखोरांनी अत्यंत निर्भीडपणे अकबरवर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर पोलीस यंत्रणेला आव्हान देत घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात मोठी खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अकबरला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे. शहराच्या मुख्य चौकात अशा पद्धतीने गोळीबार झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. “शहरात पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?” असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके रवाना केली असून आरोपींच्या शोधासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे.


























































