सांगलीत सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी मोठे त्रांगडे निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पाठबळाशिवाय कुणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा महायुतीला सत्तेसाठी बहुमत मिळाले नसल्याने मोठे राजकीय ट्विस्ट निर्माण झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीला बहुमतासाठी एक जागा कमी पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून अजित पवार गटाच्या पाठिंब्यासाठी जिल्हा नेत्यांसोबत चर्चेच्या फेऱया सुरू आहेत. त्यामुळे आघाडीला सत्तेच्या आशा निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने पाठिंबा मिळविण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. प्रसंगी अजित पवार गटाला अध्यक्षपद देण्याची तयारी भाजपने दाखवली आहे. मात्र, सद्यःस्थितीत शिंदे गट आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेते महाविकास आघाडीसोबतच जाण्याचा सूर आळवत आहेत. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, भाजप नेते व जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्हा परिषद अध्यक्ष महायुतीचाच होईल, अशी स्पष्टोक्ती पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी आमची बोलणी सुरू आहेत. प्रसंगी आम्ही अध्यक्षपद राष्ट्रवादीला देऊ, अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पक्षीय बलाबल

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वाधिक 18 जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, त्यापाठोपाठ भाजप 16,  काँग्रेस 11, शिंदे गट 7, अजित पवार गट 6, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 1, रयत क्रांती पक्ष 1 आणि जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळाली आहे. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीकडून चर्चा

सत्तेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. अजित पवार गटाचे जिल्हा नेते माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे महाविकास आघाडीसोबत जाण्यास राजी आहेत. याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, असे पक्षातील काही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपकडून जोरदार फिल्डिंग

भाजपकडूनही सत्तेसाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे. सांगलीत जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख तसेच काही पदाधिकाऱयांची बैठक पार पडली. महायुतीची मोट बांधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेण्यात यावे, असा सूर पक्षातील नेत्यांनी काढला आहे. महायुतीतील सर्व पक्ष एकत्र येतील, असा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे.

मित्रपक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत.

– निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, अजित पवार गट

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत बैठक घेणार आहे. काँग्रेससह मित्रपक्षांना सोबत घेऊन आमच्या विचाराची सत्ता जिल्हा परिषदेत येईल.

– विक्रमसिंह सावंत, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्ष.

सांगलीत सत्ता स्थापनेबाबत बैठक घेतली. बैठकीला आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील मित्रपक्षांच्या वरिष्ठांची चर्चा करीत आहे. सकारात्मक निर्णय होईल.

– सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष, भाजपा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि आमच्या विचारांच्या लोकांना सोबत घेऊन झेडपीवर सत्ता स्थापन केली जाईल. त्याबाबतच्या युतीबाबत सकारात्मक चर्चाही झाली आहे. मित्रपक्षांकडून होकार मिळाला आहे.

– देवराज पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष