
जगाला चॅटजीपीटीची (ChatGPT) ओळख करून देणारी अग्रगण्य कंपनी ‘OpenAI’ मध्ये सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे. कंपनीने चॅटजीपीटीमध्ये जाहिराती दाखवण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ वरिष्ठ संशोधक जोई हिट्झिग (Zoe Hitzig) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘OpenAI ही फेसबुकने केलेल्या चुकांचीच पुनरावृत्ती करत आहे’, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जोई हिट्झिग यांनी ‘X’ (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘ज्या दिवशी मी राजीनामा दिला, त्याच दिवशी कंपनीने जाहिरातींची चाचणी सुरू केली. लोकांच्या सर्वात खासगी विचारांचा जगातील सर्वात मोठा डेटा हा OpenAI कडे आहे. अशा परिस्थितीत जाहिरातींच्या दबावामुळे हा डेटा सुरक्षित राहील का? हे संशयास्पद आहे.’
लोकांच्या विश्वासाला तडा
‘न्यूयॉर्क टाइम्स’ मधील आपल्या लेखात हिट्झिग यांनी कंपनीला धोक्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणतात की, लोक चॅटजीपीटीशी संवाद साधताना आपले आजार, कौटुंबिक समस्या आणि अगदी देवावरील श्रद्धेबद्दलही मोकळेपणाने बोलतात. कारण त्यांना वाटते की समोरची यंत्रणा निष्पक्ष आहे. मात्र, जाहिरातींच्या माध्यमातून हा डेटा वापरल्यास युजर्सच्या मानसिकतेशी खेळ (Manipulation) केला जाण्याची भीती आहे.
फेसबुकशी तुलना
हिट्झिग यांनी OpenAI ची तुलना फेसबुकच्या सुरुवातीच्या काळाशी केली आहे. फेसबुकनेही सुरुवातीला युजर्सच्या डेटाच्या सुरक्षेची आश्वासने दिली होती, परंतु जाहिरातींच्या महसुलासाठी कालांतराने सर्व तत्त्वे धाब्यावर बसवली. तोच प्रकार आता OpenAI मध्ये घडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. चॅटजीपीटी सध्या युजर्सना खुश ठेवण्यासाठी आणि त्यांचे अवलंबित्व वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून, यामुळे ‘चॅटबॉट सायकोसिस’ (Chatbot Psychosis) सारखे धोके निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भविष्यासाठी तीन पर्याय
हिट्झिग यांनी एआय कंपन्यांना गैरप्रकार रोखण्यासाठी तीन महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत.
१. एका सेवेतील नफा दुसऱ्या सेवेसाठी वापरून युजर्सवरील आर्थिक भार कमी करणे. २. जाहिराती स्वीकारताना डेटा वापरासाठी स्वतंत्र आणि कायदेशीर देखरेख यंत्रणा असणे. ३. युजर्सचा डेटा स्वतंत्र ‘ट्रस्ट’ किंवा ‘को-ऑपरेटिव्ह’च्या नियंत्रणाखाली ठेवणे.




























































