
लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात जबरदस्त आणि आक्रमक बाण्यानंतर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. अखरे राहुल गांधीना रोखण्यासाठी भाजपने तांत्रिक मुद्द्यांवरून त्यांच्याविरोधात डाव टाकण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे. राहुल गांधी यांची संसदेची सदस्यता रद्द करण्यासाठी नोटीस दाखल केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याविरोधात कोणताही हक्कभंग प्रस्ताव (Privilege Motion) न आणता थेट सदस्यत्व संपुष्टात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत हिंदुस्थान – अमेरिका व्यापार करार आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
बुधवारी लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी जागतिक भू-राजकीय संघर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि अमेरिकेसोबतचा व्यापार करार यावर भाष्य केले होते. तसेच माजी लष्करी प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा उल्लेख केल्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा गदारोळ झाला होता. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून संसदेत निदर्शने सुरू केली आहेत.
विरोधकांचे आंदोलन सुरूच
व्यापार करारातील ‘जनविरोधी कलमे’ आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांचे खासदार गुरुवारीही संसदेच्या ‘मकर द्वार’बाहेर निदर्शने करणार आहेत.
२८ जानेवारीपासून सुरू झालेले हे अर्थसंकल्पीय अधिवेशन ६५ दिवसांचे असून त्यात एकूण ३० बैठका होणार आहेत. २ एप्रिल रोजी अधिवेशनाची सांगता होईल. दरम्यान, १३ फेब्रुवारी रोजी संसदेचे कामकाज तहकूब केले जाईल आणि ९ मार्च रोजी पुन्हा सुरू होईल. या सुट्टीत स्थायी समित्या विविध मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांची तपासणी करतील.

























































