मी कोणावरही प्रश्न उपस्थित केलेले नाही, अजितदादांना कोणाचा फोन आला ते लोकांना कळलंय; रोहित पवारांचा रोख कोणाकडे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 27 तारखेला नेमकं काय घडलं? अजितदादांचा प्रवास का बदलला आणि त्यांना कोणाचा फोन आला आणि एका राजकीय कन्सल्टंटचा या प्रकरणात काय संबंध आहे? याबाबत रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

रोहित पवार यांनी गुरूवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दादा जर 27 तारखेला गाडीने पुण्याला पोहोचून पुढे बारामतीला गेले असते तर, ही दुर्दैवी घटना घडली नसती. ज्या-ज्या घटना 27 तारखेला घडल्या त्या सगळ्या मी बोलून दाखवल्या. बैठकीला उशीर झाला त्यानंतर त्यांना एक फोन आला. तो फोन कोणाचा होता हे लोकांना कळालेलं आहे. फाईलवर तिथल्या तिथे सही झाली पाहिजे, अशी इच्छा कोणत्यातरी मोठ्या नेत्याने व्यक्त केली, असे रोहित पवार यांनी सांगितले.

दादांचा प्लॅन विमानाने जाण्याचा असता तर दुपारीचं विमानाच बुकिंग झालं असतं. त्यामुळे जो काही घटनाक्रम आहे ज्यामुळे दादांना उशीर झाला. तो मी बोलून दाखवला. मी कोणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. माझं प्रामाणिक मत आहे की, लवकरात लवकर या घटनेची चौकशी व्हावी. 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत तसेच जे प्रमुख पायलट होते ते पूर्वी कोणाला भेटले? कोणत्या हॉटेलमध्ये भेटले? कुठे कुठे गेले होते? या सगळ्या गोष्टींची माहिती काढणं तितकचं गरजेचं असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

मी आत्तापर्यंत कुठेही खोटं बोललेलो नाही. जे खरं आहे तेच मी पत्रकार परिषदेत बोललो. तटकरे स्वत: म्हणतात की, मी 27 तारखेला आलो, उशीरापर्यंत थांबलो. आणि दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतात की, प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि दादांना उशीर झाला. म्हणून दुसऱ्या दिवशी ते विमानाने गेले. त्यामुळे तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी देखील तितकीच खरी आहे, असे यावेळी रोहित पवार म्हणाले.

पॉलिटिकल कन्सल्टन्सीच्या करारावरील चर्चेमुळे उशीर, अरोराला कॉन्ट्रॅक्ट न देण्याची दादांची भूमिका

एका राजकीय कन्सल्टंटच्या बाबतची चर्चा तेथे झाली. योगायोग असा की त्या राजकीय कन्सल्टंटने गेल्या महिन्यात विमान विकत घेतलं आहे. त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची दादांची भूमिका होती. आणि कदाचित तिथेच वाद विवाद झाला. तटकरे देखील तेथे होते. यामुळे उशीर झाला आणि दादा गाडीने जाऊ शकले नाही. काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेलमध्ये आम्ही दादांबरोबर उशीरापर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोरांचे कन्सल्टंटचे लोक तेथे आले होते. त्यावेळी दादांनी त्यांच्या स्टाईलमध्ये त्या लोकांना झापलं होतं. नरेश अरोरांचा कॉन्ट्रॅक्ट जीवंत ठेवून त्याला पैसे दिले गेले पाहिजे, अशी भूमिका काही नेत्यांची 27 जानेवारीच्या बैठकीत होती. पण त्याच्या विरोधात अजित दादांची भूमिका होती, असा गौप्यस्फोट रोहित पवार यांनी यावेळी केला.

दादांच्या जवळचे कार्यकर्ते प्रमोद हिंदूरावांनी सांगितलं की, प्रफुल्ल पटेलांचा फोन आला, त्यांची फाईल तिथे होती. ती फाईल आणण्यात, सही करण्यात वेळ गेला. त्यामुळे दादा कारने जाणार होते ते विमानाने गेले. असं स्वत: प्रमोदजी म्हणाले. त्यामुळे त्यांची लोकंसुद्धा बोलायला लागली आहेत. हे पाहून आनंद झाला. गेल्या चार महिन्यांत दादा एकटे पडल्यासारखे आम्हाला वाटत होते, असे रोहित पवार म्हणाले.

विलिनीकरणाबाबत सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद

दरम्यान, लवकरच विलिनीकरणाचा निर्णय घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. ‘दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊ. ’12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती. मी आज पत्रकार परिषद घेणार होतो. आता 16 किंवा 17 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाईल’, असे रोहित पवार यांनी सांगितले.

अजितदादांच्या अपघाताबाबत माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय. काही मोठ्या नेत्यांची वेळ मिळावी यासाठी प्रयत्न करतोय. ती वेळ मिळत नाही, त्यामुळे ईमेलच्या माध्यमातून मी त्यांना पत्र लिहिणार आहे. विरोधात असताना काकासाठी आणि दादासाठी आम्ही लढतोय. जे कोणी सत्तेत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी आणि पदासाठी जे कोणी प्रयत्न करतायत त्यांना विनंती पदापेक्षा माणूसही तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे अपघाताची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.