ICC T20 WC 2026 – डर्बन ते अहमदाबाद… वर्ल्डकप इतिहासातील सहा रोमहर्षक सुपर ओव्हर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 सुरू असून बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर डबल सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला. टी-20 वर्ल्डकप इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच लढतीत दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. तर आतापर्यंतच्या वर्ल्डकप इतिहासात सहाव्यांदा सुपर ओव्हरने सामन्याचा निकाल लागला. हे सहा सामने कोणते ते जाणून घेऊया…

हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानमधील रोमहर्षक लढत

2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये डर्बनच्या मैदानावर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात चर्चिलेल्या सामन्यांपैकी एक ठरला. दोन्ही संघांनी 141 धावा केल्या. त्याकाळी सुपर ओव्हरऐवजी ‘बॉल-आउट’ पद्धत होती. हिंदुस्थानने यष्ट्यांचा अचूक वेध घेत पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला आणि विश्वविजेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

पल्लेकल मैदानावरील थरार (2012)

2012 मध्ये श्रीलंकेतील पल्लेकल स्टेडियमवर काही दिवसांच्या अंतरात दोन सामने टाय झाले. यातील पहिला सामना श्रीलंका आणि न्यूझीलंड, तर दुसरा सामना न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघात खेळला गेला.

* श्रीलंका वि. न्यूझीलंड: दोन्ही संघांनी 174 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये 13 धावांचा बचाव करत यजमान श्रीलंकेने बाजी मारली.
* न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज: काही दिवसांनंतर याच मैदानावर पुन्हा एकदा बरोबरी झाली. 139 धावांच्या बरोबरीनंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडियाने 17 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय मिळवला.

नवा इतिहास घडला

2024 च्या वर्ल्डकपने पुन्हा एकदा सुपर ओव्हरच्या थराराची आठवण करून दिली. ब्रिजटाऊनमध्ये नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामना 109 धावांवर बरोबरीत सुटला, जिथे नामिबियाने सुपर ओव्हरमध्ये 21 धावांचा बचाव करत विजय मिळवला.

मात्र, खरा मोठा उलटफेर झाला तो डॅलसमध्ये. अमेरिका या नवख्या संघाने माजी विजेता पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. दोन्ही संघांनी 159 धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. अमेरिकेने पाकिस्तानसमोर 19 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले होते. हिंदुस्थानी वंशाचा इंजिनिअर आणि गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने टिच्चून गोलंदाजी करत पाकिस्तानला केवळ 13 धावांवर रोखले आणि अमेरिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

डबल सुपर ओव्हरचा थरार

2026 मध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाने 187 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दोन्ही संघानी 17 धावा केल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी आणखी एक सुपर ओव्हर घेण्यात आली. यात आफ्रिकेने 23 धावा केल्या आणि अफगाणिस्तानला 19 धावांवर रोखत 4 धावांनी विजय मिळवला.