
रशिया सरकारने मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘व्हॉट्सॲप’वर (WhatsApp) संपूर्ण देशात बंदी घातली आहे. रशियन कायद्यांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत क्रेमलिनने गुरुवारी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘व्हॉट्सॲपने रशियन कायद्यांचे पालन करण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.’
या बंदीनंतर ‘मेटा’च्या मालकीच्या व्हॉट्सॲपने ‘X’ (ट्विटर) वर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘रशियन सरकारने लोकांना सरकारी पाळत असलेल्या ॲप्सकडे वळवण्यासाठी व्हॉट्सॲप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे. १० कोटींहून अधिक युजर्सना सुरक्षित संवादापासून दूर ठेवणे हे अत्यंत मागास पाऊल असून यामुळे लोकांची सुरक्षितता धोक्यात येईल’, असे व्हॉट्सॲपने म्हटले आहे.
रशियाच्या टेलिकॉम वॉचडॉगनुसार, व्हॉट्सॲपचा वापर दहशतवादी कारवायांचे नियोजन करण्यासाठी आणि नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळेच या ॲपचा वेग कमी करण्यापासून ते ब्लॉक करण्यापर्यंतची पावले उचलण्यात आली आहेत.
‘Max’ हा नवा पर्याय रशियाने आता व्हॉट्सॲपला पर्याय म्हणून ‘मॅक्स’ (Max) या स्वदेशी ॲपचा प्रचार सुरू केला आहे. रशियात विकल्या जाणाऱ्या सर्व नवीन स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्ये हे ॲप आधीच इंस्टॉल (Pre-installed) करणे सरकारने अनिवार्य केले आहे. या ॲपद्वारे मेसेजिंग, कॉलिंग आणि पैशांचे व्यवहार करता येणार आहेत.
पुन्हा सुरू होण्याची शक्यता किती?
दिमित्री पेस्कोव्ह यांनी ‘टास’ (TASS) या वृत्तसंस्थेशी बोलताना संकेत दिले की, जर मेटा कंपनीने रशियन नियमांचे पालन केले, तरच संवादाचे दरवाजे उघडे होतील आणि बंदी उठवण्याबाबत विचार केला जाईल. मात्र, कंपनीने आपली भूमिका बदलली नाही, तर व्हॉट्सॲप पुन्हा सुरू होण्याची शक्यता धुसर आहे.

























































