
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर भाष्य करताना त्यांनी सरकारला धारेवर धरले आणि या कराराला ‘डील’ नाही तर ‘ढील’ असल्याचे म्हटले.
अखिलेश यादव म्हणाले की, हा करार पूर्णपणे एकतर्फी असून यामुळे हिंदुस्थानची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली आहे. ५०० बिलियन डॉलरच्या या व्यापारात हिंदुस्थानच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भर घोषणांचे काय होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर हाच करार करायचा होता, तर ११ महिने उशीर का केला? या प्रदीर्घ प्रतीक्षेमुळे देशातील उद्योगपती आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर आयात वाढल्यास हिंदुस्थानी शेतकरी काय पिकवणार आणि कुठे विकणार? असा सवाल त्यांनी केला. तसेच, अद्यापही शेतकऱ्यांना एमएसपीची (MSP) कायदेशीर हमी मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
हा अर्थसंकल्प दिशाहीन असून यात २०२७ पर्यंत विकसित हिंदुस्थान बनण्याचे कोणतेही ठोस व्हिजन नाही. या बजेटमध्ये दलित, मागासवर्गीय, महिला आणि गरिबांसाठी कोणतीही विशेष योजना नसल्याचा आरोप त्यांनी केला.


























































