माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे. “मी मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी लढतोय, म्हणूनच आता अनेकांना मी वैरी वाटू लागलो असून माझ्या हत्येच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. सोलापूर येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत असताना, माझ्याच जवळच्या काही लोकांना फोडून माझ्या विरोधात कट रचला जात आहे. “आमची पैदास ९६ कुळी आहे, आम्ही खरं बोलायला शिकलो आहोत. कुणा रक्ताने माखलेल्या जातीला खुश करण्यासाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका,” असंही ते म्हणाले आहेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडताना त्यांनी सरकारला स्पष्ट संकेत दिले. सातारा संस्थानांचा जीआर निघणार म्हणजे निघणारच, त्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी बजावून सांगितले. आरक्षणाचा फायदा हा कोणत्याही एका पक्षाच्या मराठ्याला नसून तो सर्व पक्षांतील मराठा बांधवांना होणार आहे, असेही ते म्हणाले.