परभणीत शिवसेनेचे सय्यद इक्बाल महापौर, काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर; भाजपच्या ‘प्लॅन’चा धुव्वा उडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या गनिमी काव्यामुळे भाजपच्या ‘प्लॅन 28’ची अक्षरशः माती झाली आणि शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांची महापौरपदी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख यांची उपमहापौरपदी निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एका अपक्षानेही शिवसेना-काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिल्याने भाजपची भर सभागृहात नाचक्की झाली.

परभणी महापालिकेत एकूण 65 जागांपैकी शिवसेना 25 आणि काँग्रेसने 12 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला परभणीकरांनी बहुमतापासून कोसो दूर ठेवूनही सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. नगरसेवक खरेदी-विक्रीची चर्चा परभणीत रंगली. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अतिशय चलाखीने राजकारणाचा पट मांडला आणि भाजपच्या नाकावर टिच्चून यशस्वी करून दाखवला.

आज बी. रघुनाथ सभागृहात जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महापौर तसेच उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीकडून सय्यद इकबाल, तर भाजपकडून तिरुमला खिल्लारे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी दाखल केली. पीठासीन अधिकाऱयांनी हात उंचावून मतदान घेण्याचे जाहीर केले. सय्यद इकबाल यांना शिवसेनेची 25, काँग्रेसची 12 अशी 37 मते मिळणे अपेक्षित होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेविका रजिया बेगम यांनी इकबाल यांना पाठिंबा दिल्याने त्यांना 39 मते पडली. भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य आणि यशवंत सेनेने पाठिंबा देऊनही 26 मते पडली. 11 मतांनी त्यांचा पराभव झाला. उपमहापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे गणेश देशमुख यांना 38, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नजमा बेगम यांना 27 मते मिळाली. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार तिरुमला खिल्लारे यांच्यापेक्षा एक मत नजमा बेगम यांना जास्त पडले, याचीच चर्चा सध्या परभणीत होत आहे.

शिवसेना-काँग्रेसचे नगरसेवक पहाटे परभणीत

भाजपचे फोडाफोडीचे इरादे पाहून शिवसेनेने आपले सर्व नगरसेवक मुंबईला पाठवले होते, तर काँग्रेसनेही आपले नगरसेवक हैदराबादेत ठेवले होते. दोन्ही पक्षांचे नगरसेवक आज पहाटे परभणीत दाखल झाले. हॉटेल मौर्या लॉन्स येथे शिवसेना आणि काँग्रेसची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महापौरपदासाठी सय्यद इकबाल आणि उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा विजय

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा विजय आहे. परभणीला शिवसेनेचाच महापौर होणार, याबद्दल आमच्या मनात किंचितही शंका नव्हती. चंद्रपूरचा परिणाम परभणीत होणार, अशी कावकाव काही जण करत होते. परंतु तेथील राजकीय परिस्थिती वेगळी होती. परभणीत शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीच झालेली होती. परभणी शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम आम्ही करू. – खासदार संजय जाधव