
अमेरिका-व्यापार करार झाल्यानंतर याचे ढोल बडवण्यात आले. देशाला याचा मोठा फायदा होणार, असे चित्रही रंगवण्यात आले. मात्र, शेअर बाजाराने या करारात काहीही दम नसल्याचे दाखवून दिले आहे. या करारानंतर शेअर बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शेअर बाजार लवकरच नवीन विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता होती. मात्र, आता करारातील अनेक पैलू स्पष्ट होत असून बाजारातून नकारात्मक संकेत मिळत आहे.
जागतिक अस्वस्थता आणि अमेरिका- इराण संघर्षामुळे बाजार तणावात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून आशियाई शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. या घसरणीचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्राला बसला असून त्यात मोठी घसरण दिसून येत आहे. बाजाराला सुरुवात होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८०० अंकांनी कोसळला होता. 10.15 वाजता घसरण आणखी वाढून 850 अंकांवर आली. तर निफ्टीही २०० अंकांनी घसरला होता. त्यात वाढ होत ही घसरण 327 अकांपर्यंत वाढली आहे.
अमेरिकेपासून आयियाई शेअर बाजाराला एआयबद्दलची चिंता सतावत आहे. एआयमुळे बाजारात मोठी घसरण होत आहे. विशेषतः आयटी कंपन्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. शुक्रवारी उघडताच भारतीय शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला. सेन्सेक्स ७७२.१९ अंकांनी किंवा ०.९२% ने घसरून ८२,९०२.७३ वर व्यवहार करत आहे. निफ्टी ०.७८% ने किंवा २००.३० अंकांनी घसरून २५,६०६.९० वर व्यवहार करत आहे. आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण होत आहे. टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि महिंद्रा टेक यांचे शेअर्स जवळजवळ ६% ने घसरले आहेत.
बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी २४ शेअर्स खाली व्यवहार करत आहेत. उर्वरित सहा शेअर्स किरकोळ वाढले आहेत. इन्फोसिस जवळजवळ ६% ने, टीसीएस ५% पेक्षा जास्त, एचसीएल टेक ४.१४% ने आणि टेक महिंद्रा जवळजवळ ३% ने घसरले आहेत. बीएसईच्या ३,३३७ स्टॉक्सपैकी ८४७ वर आणि २,३२७ खाली व्यवहार करत आहेत. १६३ शेअर्स अपरिवर्तित आहेत. ४१ स्टॉक्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर आहेत आणि १०६ ५२ आठवड्यांच्या नीचांकावर आहेत. ५५ स्टॉक्स खालच्या सर्किटवर आहेत आणि ७९ वरच्या सर्किटवर आहेत.
अमेरिकन मार्केट सलग तिसऱ्या दिवशी घसरले आहे. आशियाई मार्केटमध्येही घसरण दिसून येत आहे. गुंतवणूकदारांना भीती आहे की नवीन एआय टूल्समुळे अनेक पारंपारिक व्यवसाय मॉडेल्सचे मोठे नुकसान होऊ शकते आणि कंपन्यांचा नफा कमी होऊ शकतो. एआयचा सर्वात मोठा परिणाम ट्रकिंग, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअरशी संबंधित स्टॉकवर दिसून येत आहे. अमेरिकन बाजारपेठेतील घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे एक ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच ९० लाख कोटी रुपये बुडाले आहेत.आगामी काळात ही घसरण आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


























































