
एपस्टीन फाइल्सच्या प्रकरणावरून आता हिंदुस्तानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. एकेकाळी ‘घर-घर मोदी’ अशी घोषणा देणारे आता ‘थर-थर मोदी’ झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत असे म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना पवन खेरा यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यावर थेट आरोप केले आहेत. खेरा म्हणाले की, “हरदीप पुरी केवळ रीड हॉफमनच्या (Reid Hoffman) मेलबद्दल बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. एपस्टीनशी माझा कोणताही संबंध नव्हता, हा पुरींचा दावा पूर्णपणे खोटा आहे. वास्तव हे आहे की, तुम्ही स्वतः कॉफी पिण्यासाठी जात होतात आणि ‘Have Fun’ असे मेसेजही लिहित होतात. याचाच अर्थ तुम्हाला सर्व काही माहित होते.”
पवन खेरा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे की, “एपस्टीन फाइल्समध्ये नेमके असे काय दडले आहे, ज्यामुळे नरेंद्र मोदी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत? ज्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात ‘घर-घर मोदी’ या घोषणेने केली होती, ते आज या फाइल्समुळे ‘थर-थर’ कापत आहेत.”



























































