
हिंदुस्थानच्या सीमेवरील दिवसेंदिवस वाढत जाणारे आव्हान मोडून काढण्यासाठी हिंदुस्थान आपली सैन्य क्षमता आणखी मजबूत करण्यावर भर देत आहे. केंद्र सरकारने आपली हवाई क्षेत्र आणखी मजबूत करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील डिफेन्स ऑक्विझिशन काऊन्सिल (डीएसी)ने राफेल जेट विमानाच्या खरेदीपाठोपाठ आता रशियाकडून 288 अतिरिक्त एस-400 मिसाईलच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र सरकार 10 हजार कोटी रुपये मोजणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियासोबत झालेल्या या करारांतर्गत हिंदुस्थानला 120 शॉर्ट रेंजची मिसाईल मिळेल. तसेच 168 लाँग रेंजची मिसाईल मिळणार आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानकडून चालवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर या मिसाईलची गरज स्पष्टपणे जाणवली आहे. मे 2025 मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूर वेळी हिंदुस्थानी लष्कराकडून एस-400 सिस्टमचा वापर करण्यात आला होता. यादरम्यान 400 किलोमीटर, 200 किलोमीटर, 150 किलोमीटर आणि 40 किलोमीटर रेंजच्या मिसाईलचा वापर शत्रूंच्या लढाऊ विमान आणि ड्रोनला शोधण्यासाठी करण्यात आला होता. तसेच हिंदुस्थानने 314 किलोमीटर दूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका मोठय़ा एअरक्राफ्टला एस-400 च्या लांब अंतरावरील मिसाईलने लक्ष्य केले होते. यानंतर पाकिस्तानला अनेक विमानांना पश्चिम सेक्टरमध्ये शिफ्ट करावे लागले होते.
काय आहे एस-400 सिस्टम
रशियाच्या एस-400 सिस्टम 400 किलोमीटरपर्यंत शत्रूंचे विमान, बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोनला ट्रक करून त्याला नष्ट करण्यात सक्षम आहे. याचे खास वैशिष्टय़े म्हणजे ही सिस्टम एकाच वेळी अनेक टार्गेटला लक्ष्य करते. या सिस्टमला हिंदुस्थानची मल्टी लेयर डिफेंस एयर डिफेंसचा मुख्य कणा मानले जाते. या नव्या करारामुळे हिंदुस्थान आपली हवाई सीमेला आणखी सुरक्षित आणि मजबूत करेल.




























































