
>> महेश उपदेव
विदर्भ-महाराष्ट्रामध्ये शिवकथाकार म्हणून आणि पुढे सद्गुरुदास महाराज म्हणून समाजामध्ये न्याय, नीती, धार्मिकता आणि राष्ट्रभक्ती जागरुक ठेवण्यासाठी प्रबोधनाचे काम करणाऱयांमध्ये सद्गुरुदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख नाव अग्रगण्य होते. आपल्या प्रसन्न आणि सरळ स्वभावाने प्रत्येक गोष्टीची बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ चिकित्सा आणि त्याची सूक्ष्म अनुभूती, याच्या आधारावर त्यांनी पुष्कळ लोकांना या कठीण काळातसुद्धा सन्मार्गी लागण्याची दीक्षा दिली. त्यांच्या जाण्याने छत्रपती सेवा प्रतिष्ठान व गुरुमंदिर परिवाराचा आधारस्तंभ निखळला आहे.
अभ्यासपूर्ण विवेचन, रसाळ व ओघवती भाषाशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तळागाळात पोहोचवण्यासाठी सद्गुरुदास ाहाराजांनी आपले आयुष्य वाहून घेतले. अथक परिश्रम, संशोधन, असंख्य साधने, कागदपत्रांचा चिकित्सक अभ्यास करत महाराजांनी त्याला पुरावे आणि दाखल्यांची जोड दिली. त्यांनी लिहिलेचे ‘शककर्ते शिवराय’ हे द्विखंडात्मक शिवचरित्र अल्पावधीतच रसिकमान्य झाले. शिवकार्य हा त्यांच्या जीवनाचा पूर्वार्ध तर गुरुकार्य हा उत्तरार्ध होता. सद्गुरुदास महाराजांना लहानपणापासूनच शिवाजी महाराजांबद्दल आकर्षण होते. विष्णुदास महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी स्वतःला वाहून घेतले. अकोला जिल्हय़ातील तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे विजयराव यांचा28 जानेवारी 1942 मध्ये जन्म झाला. वयाच्या 12 व्या वर्षी विष्णुदास महाराज व दत्त संप्रदायातील सत्पुरुषांचा कृपाशीर्वाद मिळाला. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांची शिवचरित्रावर व्याख्याने ऐकली आणि त्यांचे शिवप्रेम अधिकच वृद्धिंगत झाले. त्यानंतर विजयराव देशमुख यांनी तरुणांना कथारूप शिवचरित्र सांगण्यास सुरुवात केली. जनमानसाने त्यांना ‘शिवकथाकार’ ही पदवी बहाल केली. यातूनच त्यांनी शिवदुर्ग दर्शन यात्रेची कल्पना मांडत 1974 ला गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर शिवदुर्ग यात्रा काढली. त्यांची ही शिवदुर्ग यात्रा 1992 पर्यंत अखंड चालली. याच दरम्यान ‘अभिनव ठेव योजना’ अंतर्गत पाच वर्षांसाठी लोकांकडून शंभर रुपयांची ठेव घ्यायची व त्याच्या व्याजावर ग्रंथ निर्मितीचा खर्च करून, पाच वर्षांनंतर ठेवेसह ग्रंथ लोकांना विनामूल्य द्यायचा. या अभिनव योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवचरित्र लिहीत असतानाच ‘सिंहासनाधीश्वर’ हे नाटक, ‘महाराजांच्या मुलखात’, ‘सूर्यपुत्र’ आदि ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली.
16 फेब्रुवारी 1984, माघ पौर्णिमेला विष्णुदास महाराजांकडून त्यांना अनुग्रह मिळाला. 1990 साली विष्णुदास महाराज समाधिस्थ झाल्यावर त्यांच्याच आज्ञेने विजयराव देशमुख यांनी जयप्रकाशनगरात उपासना केंद्र सुरू केले. विजयराव हे शिवकथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होते. त्यांच्या ओजस्वी वाणीने आणि प्रभावी कथनशैलीने हजारो श्रोत्यांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या प्रवचनांमधून धर्म, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते. तसेच गुरुमंदिर परिवाराचा ते आधारस्तंभ मानले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. समाजात मूल्याधिष्ठत कार्याची परंपरा त्यांनी जोपासली. विजयराव देशमुख यांच्या जाण्याने समाजाला दिशा देणारा मार्गदर्शक हरपला आहे.






























































