
एपस्टीन फाईल्सवरून काँग्रेसने मोठा बॉम्ब फोडला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी जेफ्री एपस्टीनची अनेकदा भेट घेतली. असंख्य ई-मेल केले गेले. एक-दोन नव्हे तब्बल 45 पानांचे पुरावे आहेत, असा सनसनाटी दावा काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला.
2014 मध्ये ‘घर घर मोदी’चे नारे देत डंका वाजवला जात होता, मात्र आता ‘थर थर मोदी’ झालं आहे. मोदी तणावाखाली आहेत. त्यांच्या डोळय़ात भीती आहे. ते घाबरले आहेत. ही भीती कशाची आहे? हरदीप पुरी यांच्याकडे अशी कोणती गुपितं आहेत, ज्या कारणाने त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती खेरा यांनी केली.
एपस्टीन फाइल्स उघडल्यानंतर किमान सात देशांतील नेत्यांनी राजीनामे दिले, मात्र मोदी आणि पुरी यांचे नाव या फाइल्समध्ये येऊनही ते अजून पदावर आहेत. त्यावर बोट ठेवत खेरा यांनी तोफ डागली. हरदीप पुरी खोटं बोलत आहेत. या व्यक्तीला एक मिनीटही पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे खेरा यांनी ठणकावले.
एपस्टीनच्या कृत्यांबाबत मला माहिती नव्हती, असे पुरी म्हणत आहेत मग त्याच्या बेटावर जाण्याबाबत ते बोलतात, ‘हॅव फन’ असा मेसेज पाठवतात. त्याचा अर्थ काय, असा सवालही खेरा यांनी केला. 2008 मध्येच एपस्टीनला शिक्षा झाली होती तरीही 2014 मध्ये पुरी यांना त्याची ही बाजू माहिती नसणे यावर कुणाचा विश्वास बसेल, अशा शब्दांत खेरा यांनी हल्ला चढवला.
- हरदीप पुरी सरकारमध्ये नसताना त्यांच्या माध्यमातून देशाबाबत महत्त्वाची माहिती परकीय व्यक्तीला का दिली? मोदी, पुरी आणि एपस्टीन यांचे नाते काय होते? याचे उत्तर मोदींना द्यावेच लागेल, असे आव्हान खेरा यांनी दिले.
पुरी कोणाच्या आदेशाने एपस्टीनला भेटायचे?
एपस्टिनशी तीन-चार भेटी आणि एक–दोन ई-मेल्स झाले असे पुरी म्हणतात, पण हे साफ खोटे आहे. मी एपस्टीनची भेट मागितली नाही. असे पुरी म्हणतात तेही खोटं आहे, असे नमूद करत पुरी यांनी ‘जेफ’ असा उल्लेख करत एपस्टीनची भेट कशी आणि कितींदा मागितली त्याचे पुरावेच खेरा यांनी दाखवले. एपस्टीनची भेट घेण्यासाठी पुरी यांच्यावर मोदींचा दबाव होता का, असा सवालही खेरा यांनी केला. 2014 ते 2016 या काळात अमेरिकेत हिंदुस्थानचे तीन राजदूत राहिले. त्या तिघांना वगळून सेवेतून निवृत्त झालेले पुरी एपस्टीनला हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून का भेटत होते. कोणाच्या आदेशावर हे सगळं चाललं होतं?, असा सवालही खेरा यांनी केला.
डिजिटल इंडियाची माहिती आठ महिने आधीच एपस्टीनला दिली, 13 नोव्हेंबर 2014 रोजी अमेरिकी उद्योजक रीड
हॉफमनला एपस्टीनने ई-मेल पाठवला होता. त्यात डिजिटल इंडियाबाबत माहिती त्याने दिली होती. प्रत्यक्षात जुलै 2015 मध्ये डिजिटल इंडियाची सुरुवात झाली. म्हणजेच हिंदुस्थानातील जनतेला मोदी सरकारच्या ज्या योजनेची माहितीच नव्हती ती माहिती आठ महिने आधीच पुरी यांनी एपस्टीनला दिली होती. पुरी तेव्हा सरकारमध्ये नव्हते. सरकारशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. मग पुरींपर्यंत ही माहिती गेली कशी, असा सवाल खेरा यांनी केला.


























































