कलिनातील म्हाडाचा दोन एकर भूखंड महाटेनिस फाऊंडेशनच्या घशात, संजय पोतनीस यांनी उघड केला घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या हेतूने झालेल्या म्हाडाने आता टेनिस या परदेशी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कलिना येथील मोक्याची दोन एकर जागा टेंडरविना एक रुपया नाममात्र दराने ‘महाटेनिस फाऊंडेशन’ला दिली आहे. त्यात म्हाडा दहा कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी हा घोटाळा उघड केला आहे.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारच्या बैठकीत संजय पोतनीस यांनी हा विषय उपस्थित केला. तेव्हा सरकारी कागदपत्रात नमूद असलेली कलिना येथील म्हाडाची करमणुकीच्या मैदानासाठी राखीव असलेली दोन एकरची जागा महाटेनिस फाऊंडेशनला दिल्याचे उघड झाले आहे. मंत्रिमंडळानेही या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती संजय पोतनीस यांना या बैठकीतच देण्यात आली. यासंदर्भात आमदार संजय पोतनीस यांनी म्हाडाच्या मुख्याधिकाऱयांना पत्र पाठवून महाटेनिस फाउंडेशनला ही जागा कशी देण्यात आली त्याबाबत विचारणा केली होती.

प्रस्तावाला मंजुरी

महाटेनिस फाउंडेशनने एप्रिल 2025 रोजी म्हाडाला सादर केलेल्या प्रस्तावाला अवघ्या पाच महिन्यांत म्हाडाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी म्हाडा 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करील. यावर म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष संजीव जयस्वाल व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या सह्या आहेत.