
मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ सोहळय़ाला आता महिना होईल, मात्र तरीही विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रच मिळालेले नाही. मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. याबद्दल युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारला. कुलसचिवांची भेट घेऊन तातडीने प्रमाणपत्रे मिळावीत, अशी आग्रही मागणी केली.
मुंबई विद्यापीठाचा पदवीदान सोहळा 17 जानेवारी 2026 रोजी झाला. त्यानंतर एक महिन्याच्या आत म्हणजे 17 फेब्रुवारीपर्यंत मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांत तसेच विविध विभागांत पदवीदान सोहळा होणे आवश्यक आहे; परंतु प्रमाणपत्रांची छपाई झाली नसल्यामुळे या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आलेले नाही. अनेक विद्यार्थी त्यांच्या उच्च शिक्षण अथवा नोकरीकरिता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. खरं तर पदवीदान सोहळा नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित होता, परंतु विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठ कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेतली.
पदवी प्रमाणपत्रांची छपाई मार्च 2026पर्यंत पूर्ण होऊ शकेल, असे समजते. मात्र तरी विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी निवेदनाद्वारे केली.
मागील वर्षी प्रमाणपत्रामध्ये झालेल्या चुका होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निवेदन कुलसचिवांना देण्यात आले. कुलसचिव डॉ. कारंडे यांनी छपाई होऊन आल्यानंतर प्रमाणपत्र महाविद्यालयांना त्वरित सुपूर्द करण्याचे आदेश दिले.































































