
महिला सुरक्षेचा गंभीर मुद्दा आज शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत उपस्थित केला. 2023 या वर्षात देशात सवातीन लाखांवर महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी त्यांनी सादर केली. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात किती महिला बेपत्ता झाल्या त्याची आकडेवारी सादर करावी, अशी मागणीही केली.
अरविंद सावंत यांनी लोकसभेत नियम 377 अन्वये हा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या अहवालानुसार 2023 मध्ये देशात 4 लाख 84 हजार 584 व्यक्ती बेपत्ता झाल्या. त्यात 3 लाख 24 हजार 763 महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले. इतक्या मोठय़ा प्रमाणात महिला बेपत्ता होण्यामागे मानवी तस्करी, लैंगिक शोषण आणि संघटित गुन्हेगारी ही कारणे असल्याचेही खासदार सावंत यांनी नमूद केले.
राज्यनिहाय आकडेवारी मागणी
किती महिला आणि मुलींचा शोध घेऊन त्यातील किती जणींचे पुनर्वसन केले गेले याबाबत ठोस राष्ट्रीय आकडेवारी नसल्याचे अरविंद सावंत यांनी निदर्शनास आणले. ती राज्यनिहाय आकडेवारी पेंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेसमोर ठेवावी, तपास व शोधमोहीम अधिक तीव्र करावी आणि त्यासंदर्भातील पारदर्शक अहवाल सादर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराष्ट्रात तीन वर्षांत दोन लाख महिला, मुली बेपत्ता
महाराष्ट्रातही महिला सुरक्षेच्या मुद्दय़ाने गंभीर स्वरूप धारण केले असल्याचे अरविंद सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. 2019 ते 2021 ह्या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातून 1 लाख 78 हजार 400 महिला आणि 13 हजार 33 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याच कालखंडात मध्य प्रदेशमधून 1 लाख 60 हजार 180 महिला आणि 38 हजार 234 मुली, पश्चिम बंगाल येथून 1 लाख 56 हजार 905 महिला आणि 36 हजार 606 मुली बेपत्ता झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.



























































