
मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौरांनी नागरी प्रश्नांकडेही लक्ष दिले पाहिजे, पण त्यांना फक्त बांगलादेशी घुसखोरांचा एकच प्रश्न सतावतोय, तो तर केंद्र आणि राज्याच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील विषय आहे, असा टोला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांनी आज लगावला.
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये महापौर रितू तावडे यांच्यासह भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला आहे. मुंबईतील खोदून ठेवलेले रस्ते, न उचलला जाणारा कचरा, पादचारी मार्गांची दुरवस्था, मोकळय़ा जागांवर बिल्डरांचे अतिक्रमण, हवा आणि पाण्याचे प्रदूषण अशा नागरी प्रश्नांकडे महापौरांचे दुर्लक्ष होतेय, अशी टीका त्यांनी केली.
बांगलादेशी घुसखोरांचा विषय केंद्र आणि राज्य शासनाच्या गृहखात्याच्या अखत्यारीत येतो असे सांगताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. बांगलादेशी हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे कसे घुसले? ते देशाच्या एका टोकापासून भाजपशासित राज्यांतून मजल दरमजल करीत मुंबईत कसे काय येऊ शकले? इतकी वर्षे ते इथे कसे काय राहिले? केंद्रात तर दशकभरापासून भाजपचे सरकार आहे, मग या राष्ट्रीय सुरक्षेतील अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचे अपयश की प्रशासकीय अपयश? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी
जर मोठय़ा संख्येने बांगलादेशी घुसखोर हिंदुस्थानात शिरले असतील तर त्यांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर पाठवण्यात आलेले अपयश केंद्र व राज्य सरकारने का लपवले? राष्ट्रीय सुरक्षेबाबत केंद्रातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे हेच यातून सिद्ध होते, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
























































