
पुणे शहरातील मुंढवा परिसरात असलेल्या सर्वे क्रमांक 88मध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासावर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलीस वाचवत आहेत. दस्तऐवज रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनी न्यायालयात गेली असून त्याआधीच शीतल तेजवानी यांनी आपला स्वतंत्र दावा दाखल केला आहे. अमेडिया कंपनीने आपल्या दाव्यात शीतल तेजवानी यांनी फसवणूक केली असून त्यांच्याकडे कायदेशीर मालकी हक्क नसल्याचे आरोप केले होते. त्यावर तेजवानी यांनी न्यायालयात अर्ज दाखल करत आमचीच फसवणूक झाल्याचा दावा केला आहे.
कुंभार यांनी खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले, अमेडिया कंपनीच्या डायरेक्टरसोबत 2021 साली पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आली होती. पॉवर ऑफ अटर्नी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि शीतल तेजवाणी यांच्यात झाली होती. त्यानुसार यांचे सर्व नियंत्रण अमेडिया कंपनीकडे होते. त्यांनीच सर्व निर्णय घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. जमीन घोटाळा प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजल्यानंतर अमेडिया कंपनीकडून उलट आरोप करण्यात येत असून कंपनीने री-इंजिनीअरिंगसारखे शब्द वापरत आमच्यावर आरोप केले आहेत. पोलिसांनी पॉवर ऑफ अटर्नीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना बाजूला ठेवले आहे. यावरून काही मुख्य आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने गांभीर्याने घेऊन प्रकरणाचा तपास करायला पाहिजे. मात्र काही विशिष्ट लोकांना वाचवण्यासाठी तपास अर्धवट ठेवण्यात आला आहे, असाही आरोप कुंभार यांनी केला आहे.
























































