
कोयना अभयारण्य येथील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘हिरकणी’ (एसटीआर 06) वाघीण आता चिपळूणच्या माथ्यावरील जंगलांच्या दिशेने प्रवास करत असून तिच्या हालचाली नांदिवसे परिसरातील डोंगरकपारीत आढळून आल्या आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मॉनिटरिंग सेंटरकडून प्राप्त झालेल्या जीपीएस सिग्नलनंतर चिपळूण वन विभाग तातडीने सतर्क झाला आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच नांदिवसे गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि खबरदारीच्या सूचना दिल्या. डोंगराळ भागात एकटे जाणे टाळावे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत तसेच रात्री विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले.
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागलवाडी परिक्षेत्रात 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एसटीआर 06 या वाघिणीला पकडण्यात आले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर 6 फेब्रुवारीला तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आणि 7 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता कोयना अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. त्यानंतर ‘हिरकणी’चा ऐतिहासिक मुक्त संचार सुरू झाला. यापूर्वी एसटीआर 03 हा ‘बाजी’ नर वाघ तसेच ‘तारा’ आणि ‘चंदा’ या वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल आहेत. आता ‘हिरकणी’च्या समावेशामुळे प्रजननवृद्धीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वाघिणीच्या हालचालींवर सातत्याने जीपीएसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.
जैवविविधतेने समृद्ध परिसर
सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिह्यांत पसरलेला सुमारे 1165 चौरस किलोमीटरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने समृद्ध आणि अनेक दुर्मिळ प्रजातींचे अधिवास असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या परिसरात वाघांचे संवर्धन आणि नैसर्गिक अधिवास मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
चिपळूण तालुक्यातील नांदिवसे गावच्या डोंगराळ भागात जिथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची हद्द आहे. त्या परिसरात हिरकणीची एन्ट्री झाली आहे, परंतु गावातील ग्रामस्थांना त्याचा कोणताही धोका नाही. येथील नागरिकांनी जंगलात जाऊ नये. तसेच वाघ किंवा इतर कोणताही प्राणी दिसल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क करावा.
– सताप्पा सावंत, वनपाल, चिपळूण




























































