
>> दुष्यंत पाटील, [email protected]
18 व्या शतकात व्हेनिसचं कालातीत सौंदर्य ‘कैद’ करणारा इटालियन चित्रकार कॅनालेट्टो याने चितारलेली चित्रं त्या काळातली श्रीमंती आणि वैभव यांचा पुरावा दर्शवणारी आहेत. यातीलच एक अजरामर चित्र म्हणजे ‘द एन्ट्रन्स टू द ग्रँड कॅनॉल.’ हे चित्र व्हेनिस शहराचा जिवंत इतिहास सांगते.
बऱ्याच वेळा चित्र म्हणजे फक्त कॅनव्हासवर भरलेले रंग नसतात, तर चित्रकारानं काळाला कायमचं कैद करण्याची केलेली किमया असते. अशी किमया करणाऱ्या किमयागारांपैकी एक म्हणजे इटालियन चित्रकार कॅनालेट्टो. 18 व्या शतकात जेव्हा कॅमेरे नव्हते, तेव्हा श्रीमंत युरोपियन लोक आपल्या इटलीमधल्या व्हेनिसच्या सहलींच्या आठवणी जतन करण्यासाठी ‘काळाला कैद’ केलेली व्हेनिसची चित्रं विकत घ्यायचे. अशा चित्रांसाठी कॅनालेट्टो प्रसिद्ध होता. तो व्हेनिसमधल्या दृश्यांची इतकी सुंदर चित्रं कायचा, की ती पाहताना व्हेनिसमध्ये प्रत्यक्ष गेल्यासारखं वाटायचं. त्याचं ‘द एन्ट्रन्स टू द ग्रँड कॅनॉल’ (ऊप हूंहम tद tप उraह् ण्aहत्) हे चित्र म्हणजे व्हेनिस शहराचा जिवंत इतिहास आहे.
कॅनालेटोचा जन्म 1697 मध्ये व्हेनिसमध्ये एका कलाकार कुटुंबात झाला होता. त्याचे वडील नेपथ्यकार होते. कॅनालेटोनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात नाटकात पार्श्वभूमीला वापरले जाणारे पडदे रंगवून केली. त्यामुळे त्याला भव्य, नाटय़मय दृश्यं वेगवेगळ्या प्रकारे रंगवण्याचा अनुभव मिळाला. यानंतर तो काही काळासाठी रोमला गेला. तिथे तो इतर ‘ह्यू-पेंटर्स’ पासून प्रेरित झाला आणि त्याला आपल्या आयुष्याचं खरं ध्येय गवसलं. मग तो व्हेनिसला परतला.
त्या काळात युरोपमधल्या श्रीमंत तरुणांना आपल्या शिक्षणानंतर ‘ग्रँड टूर’ करायला लागायची. याचाच भाग म्हणून हे तरुण संस्कृती आणि कला शिकण्यासाठी इटलीला जायचे. व्हेनिस हे त्यांचे आवडते शहर होते. त्या काळातले लोक आपली आठवण म्हणून शहराची सुंदर चित्रं विकत घ्यायचे. कॅनालेट्टो अशा ‘स्मृती- चित्रं’ रंगवण्यात माहीर होता. असंच एक चित्र म्हणजे ‘द एन्ट्रन्स टू द ग्रँड कॅनॉल.’
या चित्राकडे पाहिल्यावर पहिली गोष्ट जाणवते, ती म्हणजे तिथला मध्यान्हीचा लख्ख सूर्यप्रकाश. चित्रात डाव्या बाजूला एक भव्य घुमट असलेलं चर्च दिसतेय. कॅनालेट्टोनं चर्चच्या भिंतींवरचं कोरीव काम आणि खांबांचे बारकावे इतक्या अचूकतेनं रेखाटले आहेत की ते पाहताना आपण तिथे प्रत्यक्षच उभं आहोत असं वाटतं. चित्रात दिसणारा ग्रँड कॅनॉल म्हणजे व्हेनिसचा मुख्य जलमार्ग आहे. चित्रात दिसणारं निळ्या-हिरव्या रंगाचं पाणी आणि त्यावर पडणारं इमारतींचं प्रतिबिंब अतिशय वास्तववादी वाटतं. पाण्यात नावांमधून श्रीमंत लोक जात आहेत, तर काही ठिकाणी मजूर कामात व्यस्त आहेत. चित्रात दिसणारी माणसं जरी छोटी असली, तरी त्यांच्या हालचालींमधून त्या काळातली धावपळ स्पष्ट जाणवते. या धावपळीमुळेच हे चित्र त्या काळातलं व्हेनिस जिवंतपणे डोळ्यांसमोर आणतं. कॅनालेट्टो हा त्याच्या ‘अचूकतेसाठी’ आणि चित्रातल्या बारकाव्यांसाठी ओळखला जातो. तो फक्त अंदाजानं चित्र कानव्हता. असं म्हणतात की, तो ‘कॅमेरा ऑब्सक्युरा’ नावाच्या एका उपकरणाचा वापर करायचा. हे उपकरण म्हणजे आजच्या कॅमेऱ्याचा पूर्वज मानलं जातं.
हे चित्र म्हणजे फक्त एक कलाकृती नाही, तर एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. 18 व्या शतकात व्हेनिस हे व्यापाराचं आणि कलेचं केंद्र होते. हे चित्र म्हणजे त्या काळातली श्रीमंती आणि वैभव यांचा पुरावा आहे. कॅनालेट्टोची ही चित्रमालिका प्रामुख्यानं जोसेफ स्मिथ याच्या मध्यस्थीनं विकली गेली होती. जोसेफ स्मिथ हा त्या काळातला व्हेनिसमधला ब्रिटीश वाणिज्य दूत होता. पु1762 मध्ये स्मिथनं आपला संग्रह राजा जॉर्जला (तिसरा) विकला. यामुळे कॅनालेट्टोची अनेक चित्रं ब्रिटीश रॉयल कलेक्शनचा भाग बनली.
जेव्हा आपण हे चित्र पाहतो, तेव्हा आपण फक्त तिथल्या जलमार्गाचं दृश्य पाहत नाही, तर आपण व्हेनिसच्या सुवर्णकाळाचा प्रत्यक्षात अनुभव घेतो. आपल्याला नाविकांच्या पाण्यात वल्हवण्याचा आवाज ऐकू येतो, खारट हवेचा गंध येतो आणि युरोपभर चर्चेचा विषय असलेल्या शहराचा उत्साह जाणवतो! कॅनालेटोनं फक्त एक ठिकाण रंगवलेलं नाही; त्यानं तिथलं वातावरण, उत्साह आणि तिथलं कालातीत आकर्षण कॅनव्हासवर उतरवलंय. हे जगप्रसिद्ध चित्र सध्या अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातील ‘म्युझियम ऑफ फाइन आर्टस्, ह्युस्टन’ या ठिकाणी आहे. आजही हे चित्र पाहताना लोकांना क्षणभर त्या काळच्या व्हेनिसमध्ये गेल्यासारखं वाटतं.


























































