आम्ही तुमच्यासाठी तिकीट बुक केलेय, तुम्ही फक्त विमानात बसा, मणिपूरमधील जनता तुमची वाट बघतेय; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसाम दौऱ्यादरम्यान मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने पंतप्रधानांच्या नावाने गुवाहाटी ते इम्फाळ विमान तिकीट बुक केले. पंतप्रधानांनी फक्त विमानात बसावे आणि एका तासाचा प्रवास करून मणिपूरमध्ये यावे. मणिपूरमधील जनता त्यांची वाट पाहत आहे. मणिपूरच्या लोकांना सांत्वन देण्यासाठी त्यांना फक्त एक तासाचा प्रवास करावा, असे आवाहन करत काँग्रेसने मोदी यांना टोला लगावला.

आसाम दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस पक्षाने हल्ला चढवला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पंतप्रधानांना हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देण्याचे आवाहन केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये, खेरा यांनी म्हटले आहे की, निवडणूक असलेली राज्यांना नेहमीच तुमची सर्वोच्च प्राथमिकता असते. मात्र. मणिपूर २०२३ पासून हे राज्य जळत आहे आणि आता पुन्हा तिथे हिंसाचार होत आहे. त्यामुळे तुम्ही मणिपूरमधील जनतेला धीर देण्यासाठी यावे. तुम्ही आज आसाममध्ये आहात. मणिपूर येथून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. कृपया तिथेही जा. तेथील जनता तुमची वाट बघत आहे. तुम्ही तिथे भट दिल्याने तेथील जनतेला धीर मिळेल, असे खेरा यांनी म्हटले आहे. विमान तिकिटाचा फोटो शेअर करताना ते म्हणाले की, तुमच्या सोयीसाठी, आम्ही गुवाहाटी ते इम्फाळचे तिकीट बुक केले आहे, तुम्हाला फक्त विमानात बसावे लागेल. “तुमचा नंबर माझ्याकडे नसल्याने मी इथे तिकीट शेअर करत आहे.

२०२३ पासून सुरू असलेल्या मणिपूरमधील हिंसाचार आणि हिंसाचारावरून विरोधक केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, त्यात त्यांना यश आलेले नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. खेरा यांनी उपहासात्मक केलेल्या आवाहनला पंतप्रधान कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या अनोख्या राजकीय निषेधाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.