
>> प्रा. आशुतोष पाटील
पुराश्मयुगीन ते पौराणिक असा संदर्भ असणारे पुरातत्त्वीय स्थळ म्हणजे प्रकाशा. तापी, गोमाई आणि पुराणात उल्लेखलेली, पण लुप्त झालेली पुलिंदा या तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या प्रकाशा या स्थळाचा अनेक पुराणकथामध्ये उल्लेख दिसून येतो. भारतीय पुरातत्त्व खात्याने इ.स. 1955 साली केलेल्या उत्खननानंतर प्रकाशा हे ठिकाण उजेडात आले. याच तापी नदीच्या खोऱयात प्रकाशाव्यतिरिक्त बहाळ, टेकवाडा, सावळदा, चिंचोडा, कवठे ही महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे आहेत.
महाराष्ट्रात अनेक अशी पुरातत्त्वीय स्थळे आहेत, जी केवळ ऐतिहासिक नाहीत, तर पुराश्मयुगीन ते पौराणिकदेखील आहेत. त्यातील महत्त्वाचे एक स्थळ म्हणजे प्रकाशा. प्रकाशा या नावासंदर्भातही पुराणांमध्ये कथा येते. नंदूरबार जिह्यात स्थित असलेल्या प्रकाशा या ठिकाणाला ‘दक्षिण काशी’चे महत्त्व प्राप्त आहे. तापी नदीच्या किनारी स्थित प्रकाशा हे त्रिवेणी संगमावर वसलेले गाव असून तापी, गोमाई आणि पुराणात उल्लेखलेली, पण लुप्त झालेली पुलिंदा या तीन नद्यांचा येथे संगम होतो. हे स्थळ उजेडात आले ते भारतीय पुरातत्त्व खात्याने इ.स. 1955 साली केलेल्या उत्खननानंतर! याच तापी नदीच्या खोऱयात प्रकाशाव्यतिरिक्त बहाळ, टेकवाडा, सावळदा, चिंचोडा, कवठे ही महत्त्वाची पुरातत्त्वीय स्थळे आहेत. 1955 साली प्रकाशा येथे झालेल्या या उत्खननात संशोधकांना प्रागैतिहासिक ते ऐतिहासिक असे इथल्या वस्तीचे पुरावे सापडले. त्यांना येथे लोहयुगाचे अवशेषदेखील प्राप्त झालेले आहेत. या सर्व उपलब्ध साधनांच्या आधारे येथील वसाहतींचे चार विविध टप्पे पडतात. त्यात ताम्रपाषाणयुग- इ.स.पू. 1700 ते 1300, लोहयुग- इ.स.पू 700 ते 100, ऐतिहासिक काळ- इ.स.पू. 100 ते इ.स. 600 व ऐतिहासिक काळ- इ.स. 500 ते 1100 यांचा समावेश होतो.
येथे उत्खननांत रंगवलेली नक्षी असलेली मातीची भांडी, विविध धातू जसे तांबे, लोखंड, शिसे यांच्या वस्तू, हाडे, दगडी हत्यारे, टेराकोटा मातीच्या मूर्ती, विविध काळातील नाणी, मौल्यवान खडे व इतर दगडी साधने सापडलेली आहेत. येथील काही भांडय़ांवर विविध नक्षीकामदेखील केलेले आढळते.महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱयांचे स्थळ म्हणून तापी खोऱयाकडे बघितले जाते. ताम्रपाषाण काळ हे महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या दृष्टीने आद्य ठरला व त्याच काळात महाराष्ट्रात शेती सुरू झाली असे संशोधकांचे मत आहे. प्रकाशा याच ठिकाणी विविध संस्कृती जसे सावळदा, माळवा, जोर्वे व उत्तर सिंधू संस्कृती यांचा संगमदेखील पाहायला मिळतो. प्रकाशा येथे सापडलेल्या विविध साधनांच्या आधारे सातवाहन काळात प्रकाशा हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असावे असे दिसते.
ऐतिहासिक काळातही प्रकाशाचे महत्त्व कमी होत नाही. येथे आपल्याला एकूण सहा शिलालेख प्राप्त झालेले आहेत, ज्यांचा काळ यादव ते मराठा काळ आहे. त्यातील पाच मराठाकालीन आहेत तसेच प्रकाशाच्या इतिहासाशी संबंधित दोन ताम्रपटही आपल्याला उपलब्ध होतात. ते प्रकाशाजवळील जवखेडा व गुजरातमधील कलछल येथून प्राप्त आहेत. प्रकाशा या गावाला पुराश्मयुगीन काळापासुन महत्त्व प्राप्त झालेले आहे, ते महत्त्व उत्तरकाळातदेखील टिकून राहिले. त्रिवेणी संगम म्हणून जे धार्मिक महत्त्व या स्थळाला लाभले, त्यामुळे याची उंची अधिकच वाढली. येथे आज बघण्यासाठी छोटी मोठी 20 मंदिरे आहेत.
प्रकाशा हे पुरातत्त्वीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे असून अधिक अन्वेषण आपल्याला अभ्यासाचा नवा दृष्टिकोन देऊ शकतो. तापीच्या खोऱयात वसलेल्या अनेक पुरातत्त्वीय स्थळांचे महत्त्व लक्षात घेता येथे अधिक अभ्यास होण्याची गरज आहे असे वाटते.
‘शंभर वेळा काशी, एकदा प्र्रकाशी’ असे प्रकाशा या ठिकाणाबाबत म्हटले जाते. याचे कारण आहे प्रकाशा व आजुबाजूच्या परिसरात अनेक मंदिरं आहेत. मंदिर समूह असलेल्या या परिसराचे मध्ययुगीन काळातील धार्मिक महत्त्व अधोरेखीत करणारे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. येथे केदारेश्वर हे प्रमुख मंदिर असून संगमेश्वर, पुष्पदंतेश्वर, गौतमेश्वर, काशीविश्वेश्वर ही मध्ययुगीन स्थापत्यवैभव दर्शवणारी मंदिरे आहेत.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)
[email protected]


























































