
>> विशाल फुटाणे
तुळजाभवानी शक्तिपीठ मंदिरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव (ता. तुळजापूर) येथील प्राचीन महादेव मंदिरात नुकताच चामुंडा देवीच्या मूर्तीवर कोरलेला एक शिलालेख आआला. हा शिलालेख मराठवाडय़ाच्या इतिहासासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा असून तो तत्कालीन राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक संरचनेचेही द्योतक आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजाभवानी शक्तिपीठ मंदिरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावरगाव (ता. तुळजापूर) येथील प्राचीन महादेव मंदिरात नुकताच चामुंडा देवीच्या मूर्तीवर कोरलेला एक शिलालेख आआला. तो या परिसराच्या प्राचीन इतिहासाला चालना देणारा आहे. येथील उग्र अशी चामुंडा मूर्ती कलात्मक व धार्मिकदृष्टय़ा वेगळी आहे. चामुंडा देवीची मूर्ती चतुर्भुज असून ती उग्र स्वरूपात साकारलेली आहे. देवीच्या हातात त्रिशूळ, खड्ग, डमरू आणि नरमुंड अशी आयुधे दिसून येतात. ही मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने शैवशक्त परंपरेतील चामुंडा देवीच्या प्रचलित स्वरूपाशी पूर्णत सुसंगत आहे. विशेष म्हणजे ही देवी प्रतिमा शैव महादेव मंदिरात प्रतिष्ठापित केलेली आहे. यामुळे शैव आणि शक्त उपासना या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या धार्मिक परंपरा असल्याचे अधोरेखित होते.
मध्ययुगीन दक्षिण भारतात शिव आणि शक्ती यांची संयुक्त उपासना राजाश्रयीत स्वरूपात मोठय़ा प्रमाणावर प्रचलित होती, त्याचेच प्रतिबिंब येथे पाहायला मिळते. या मूर्तीवर कोरलेला शिलालेख मराठवाडय़ाच्या इतिहासासाठी अत्यंत निर्णायक ठरतो. या शिलालेखात कदंबकुल महामंडळेश्वर कुमार सोमदेव असा उल्लेख आहा उल्लेख केवळ एका व्यक्तीची ओळख सांगणारा नसून, तो तत्कालीन राजकीय, प्रशासकीय आणि धार्मिक संरचनेचेही द्योतक आहे. कदंबकुल हा शब्द वंशीय ओळख अधोरेखित करतो. कदंब राजवंश हा दक्षिण भारतातील एक प्राचीन आणि प्रतिष्ठित राजवंश असून त्यांचा उदय इ.स. चौथ्या शतकात बनवासी (आधुनिक कर्नाटक) येथे झाला. मयूरवर्मा या राजाने या वंशाची स्थापना केली आणि पुकाही शतकांत कदंबांनी कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशांत आपला प्रभाव निर्माण केला.
कदंब राजवंशाची ओळख धार्मिक सहिष्णुता आणि विविध उपासना पद्धतींना दिलेल्या आश्रयामुळे निर्माण झाली. शैव, वैष्णव आणि शक्त उपासना या तिन्ही परंपरांना त्यांनी समान महत्त्व दिले. त्यामुळे कदंब राजांच्या काळात शिवमंदिरे, देवीमंदिरे आणि विविध मठांची स्थापना मोठय़ा प्रमाणावर झाली. सावरगाव येथील चामुंडा देवीची मूर्ती ही या व्यापक धार्मिक धोरणाचा मराठवाडय़ातील विस्तार असल्याचे सूचित करते. महामंडळेश्वर ही पदवी मध्ययुगीन दख्खनमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जात असे. महामंडळेश्वर म्हणजे मोठय़ा प्रशासकीय प्रदेशाचा अधिपती, सामंताधिपती किंवा प्रादेशिक शासक. चालुक्य, राष्ट्रकूट, होयसळ आणि यादव काळातील अनेक सामंत आणि प्रांतिक अधिकारी या पदवीने ओळखले जात. त्यामुळे कुमार सोमदेव हे केवळ धार्मिक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर त्यांच्याकडे प्रशासकीय आणि राजकीय अधिकार असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी चामुंडा देवीच्या मूर्तीची निर्मिती करून तिची मंदिरात प्रतिष्ठापना केली, यावरून त्यांचा या प्रदेशातील सक्रिय सहभाग स्पष्ट होतो.
या शिलालेखीय पुराव्यामुळे मराठवाडय़ाच्या इतिहासाविषयी प्रचलित असलेल्या काही एकांगी कल्पनांवर पुनर्विचार करावा लागतो. अनेकदा मराठवाडय़ाचा इतिहास यादव, दिल्ली सल्तनत किंवा नंतरच्या काळातील सत्तांपुरताच मर्यादित केला जातो. मात्र सावरगाव येथील कदंब वंशीय महामंडळेश्वराचा उल्लेख दर्शवतो की, हा प्रदेश उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय व सांस्कृतिक प्रवाहांचा संगम होता. दक्षिण भारतीय राजवंशांचा प्रभाव मराठवाडय़ात केवळ सांस्कृतिक नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही पोहोचलेला होता. तुळजाभवानी क्षेत्राच्या दृष्टीने पाहता, हा शिलालेखीय पुरावा अधिक महत्त्वाचा ठरतो. तुळजाभवानीच्या उपासनेमागे राजाश्रयीत शैवशाक्त परंपरेचा मजबूत पाया होता. चामुंडा, योगेश्वरी, भद्रकाली, महिषासुरमर्दिनी अशा उग्र शक्तीस्वरूपांची उपासना ही दक्षिण भारतातील राजवंशीय परंपरेत महत्त्वाची होती आणि त्याच परंपरेचा विस्तार तुळजाभवानी क्षेत्रात झालेला दिसतो.
तुळजाभवानी मंदिरातील पुजारी आजही ‘कदम’ आडनावाचे असणे ही एक महत्त्वाची सामाजिक-सांस्कृतिक परंपरा मानली जाते. ‘कदम’ हे आडनाव कदंब वंशाशी निगडित आहे. धार्मिक स्थळांवरील पुजारी परंपरा बहुतेक वेळा प्राचीन राजाश्रय, वंशपरंपरा आणि धार्मिक अधिकार यांच्याशी जोडलेली असते. या संदर्भात महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील कदंबवनप्रियवासिनी हा उल्लेख विशेष लक्षवेधी ठरतो. देवीला कदंबवनाशी जोडणारा हा उल्लेख केवळ काव्यात्मक अलंकार नसून, तो तत्कालीन राजकीय-सांस्कृतिक वास्तवाचे आहे. अनेक वेळा स्तोत्रे, पुराणकथा आणि लोकपरंपरा या इतिहासाच्या मौखिक स्मृती म्हणून कार्य करतात.
सावरगाव येथील चामुंडा देवीचा शिलालेख आकाराने लहान असला, तरी त्याचे ऐतिहासिक मूल्य अत्यंत मोठे आहे. कदंब वंशीय अधिकाऱयांनी मराठवाडय़ात देवालये, मूर्ती आणि उपासना परंपरा रुजवल्याचे यातून दिसून येते. या क्षात्रभूमीवर पाऊल टाकताना केवळ कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे नाव ओठांवर येत नाही, तर अनामिक राजवंश, विस्मरणात गेलेले सामंत आणि कोरलेल्या दगडांत अडकलेली स्मृतीही नकळत डोळ्यासमोर उभी राहतात. सावरगाव येथील चामुंडा देवीचा शिलालेख आकाराने लहान असला, तरी त्याचे ऐतिहासिक मूल्य अत्यंत मोठे आहे. कदंबवंशीय अधिकाऱयांनी मराठवाडय़ात देवालये, मूर्ती आणि उपासना परंपरा रुजवल्याचे यातून दिसून येते.
(लेखक इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)

























































