
देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये शनिवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सेक्टर 39 परिसरातील एका कारमध्ये तरुण आणि तरुणीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानुसार, तरुणाने आधी तरुणीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर 39 परिसरात उभ्या असलेल्या एका कारमधून अचानक गोळीबाराचा मोठा आवाज आला. यावेळी जवळच असलेल्या एका डिलिव्हरी बॉयने सतर्कता दाखवत तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कारचे दरवाजे आतून बंद होते. गाडीची काच फोडून पाहिले असता आत सुमित आणि रेखा या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सुमितच्या हातात बंदूक असल्याचे दिसून आले असून, यावरून त्यानेच हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी मृतदेहांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली आहे. मृत तरुण सुमित हा दिल्लीतील त्रिलोकपुरी येथील रहिवासी होता, तर तरुणी रेखा नोएडा सेक्टर 58 मध्ये वास्तव्यास होती. या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली असून पोलिसांनी त्यांचे शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असावी किंवा त्यामागे अन्य काही कारण आहे, याचा सखोल तपास नोएडा पोलीस करत आहेत.


























































