IND Vs PAK – पाकिस्तानी कर्णधाराची इच्छा पूर्ण होईल! अभिषेक शर्माच्या खेळण्यावर सूर्यकुमार यादवची मजेशीर प्रतीक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये उद्या (15 फेब्रुवारी 2026) जोरदार घमासान होणार आहे. कोलंबोच्या प्रेमादास स्टेडियमवर उभय संघ एकमेकांना भिडणार आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवची पत्रकार परिषद पार पडली. पत्रकारांशी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा खेळणार की नाही? या प्रश्नाचं मजेशीर उत्तर देत पाकिस्तानी कर्णधाराची फिरकी घेतली आहे.

अभिषेक शर्मा सध्या दमदार फॉर्मात आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. याच संदर्भात सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सूर्या म्हणाला की, “जर पाकिस्तानी कर्णधाराची इच्छा असेल की, आम्ही अभिषेकला खेळवावं, तर ठीक आहे तो उद्या खेळेल.” असं मजेशीर उत्तर यावेळी सूर्याने दिलं. त्यामुळे आता अभिषेक शर्माची तोडफोड फटकेबाजी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक झाले आहेत. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली होती.

अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच विस्फोटक फलंदाज करत गोलंदाजांना घाम फोडला आहे. टी20 क्रिकेटमध्ये अभिषेक शर्माचा पाकिस्तानविरुद्धचा स्ट्राईक रेट 189.66 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांवर सामना सुरू होण्यापूर्वीच दबाव असल्याची चर्चा आहे. मागील वर्षी पार पडलेल्या आशिया चषकामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले होते. तिन्ही सामन्यांमध्ये त्याने 36.67 च्या सरासरीने आणि एका अर्धशतकाच्या जोरावर 110 धावा केल्या होत्या.