
>> अॅड. दादाभाऊ तळपे
शेती, ऋतुचक्र, ऐतिहासिक घटना, देवदेवतांचे अवतार, तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्ये इत्यादी प्रत्येक गोष्टीला आपल्या संस्पृतीने सणांच्या माध्यमातून अर्थ प्राप्त करून दिला. अशा असंख्य सणांमध्ये केवळ धार्मिक विधी नव्हे तर अस्तित्वाच्या गूढतेशी माणसाला जोडणारा सण म्हणजे महाशिवरात्री. वर्षभरात येणाऱया बारा शिवरात्रींपैकी ही एक विशेष रात्र. कारण त्यात पौराणिक, आध्यात्मिक, योगिक आणि वैज्ञानिक अशा अनेक स्तरांवरील अर्थ दडलेले आहेत. महाशिवरात्रीशी निगडित अनेक आख्यायिका भारतीय पुराण साहित्यात आढळतात. त्यामध्ये तीन प्रमुख मान्यता विशेषत्वाने सांगितल्या जातात.
- शिव-पार्वती विवाह ः या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. हिमालयकन्या पार्वतीने कठोर तपश्चर्या करून शिवांना पती म्हणून प्राप्त केले. शिव आणि पार्वती यांचे मिलन हे केवळ दैवी विवाह नसून शिवशक्तीचे, म्हणजेच चेतना आणि ऊर्जा यांच्या एकत्वाचे प्रतीक मानले जाते. हा उत्सव म्हणजे गृहस्थाश्रमातील लोकांसाठी आदर्श दांपत्य, समरसता आणि परस्पर पूरकतेचा संदेश देणारा.
- लिंगोद्भव- ज्योतार्ंलग प्रकट होणे ः शिवपुराणानुसार, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद झाला. त्या वेळी एक अनंत अग्निस्तंभ प्रकट झाला. त्या ज्योतीच्या आरंभ-शेवटाचा शोध घेताना दोघेही अपयशी ठरले. तो अनंत स्तंभ म्हणजेच शिवाचे ज्योतार्ंलग स्वरूप होते. महाशिवरात्री ही त्या लिंगोद्भवाची रात्र मानली जाते. त्यामुळे या दिवशी शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे
- समुद्रमंथन आणि नीलकंठ ः समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडले. त्या विषामुळे सृष्टीचा विनाश होण्याची शक्यता निर्माण झाली. तेव्हा भगवान शिवाने ते विष प्राशन करून जगाचे रक्षण केले. विषामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि ते ‘नीलकंठ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याग, करुणा आणि विश्वरक्षण यांचे हे प्रतीक आहे.
- शिव ः देव की तत्त्व? ः सामान्य भक्तिभावात शिव देव म्हणून पूजले जातात; परंतु योगपरंपरेत शिवाला देव नव्हे, तर आदियोगी आदिगुरू मानले जाते. हजारो वर्षांच्या समाधीनंतर जेव्हा शिव पूर्णपणे निश्चल झाले, तेव्हा त्या अवस्थेला महाशिवरात्रीची रात्र मानले जाते.
- अंधाराचा उत्सव का? ः शिवरात्री ही महिन्यातील सर्वात काळोखी रात्र असते. प्रकाशाच्या उत्सवांशी परिचित असलेल्या मनाला प्रश्न पडतो. अंधाराचा उत्सव का साजरा करायचा? आध्यात्मिक साधकांसाठी ही रात्र ‘नष्ट होण्याची’ अहंकार, मर्यादा, अज्ञान यांच्या नाशाची रात्र आहे. प्राचीन भारतीय प्रार्थनांमध्ये “मला तुझ्यासारखा कर’’ हीच भावना होती म्हणजेच मर्यादित अस्तित्वाचे अमर्यादात विलयन.
- महाशिवरात्री आणि ऊर्जेचे विज्ञान ः योगपरंपरेनुसार या विशिष्ट रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील ग्रहस्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरीत्या वरच्या दिशेने प्रवाहित होते. या प्रवाहाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर जागरण करण्याची परंपरा आहे.
पाठीचा कणा ताठ ठेवून ध्यान करणे, मंत्रजप करणे, जागरण करणे यामागील हेतू म्हणजे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह स्थिर आणि सजग ठेवणे. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नसून शरीर-मन-ऊर्जा यांच्या समन्वयाची प्रक्रिया आहे.
महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत
- उपवास ः भक्त सकाळी लवकर स्नान करून उपवासाचा संकल्प करतात. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून इंद्रियसंयम आणि मनशुद्धीचा मार्ग आहे. फराळात सात्त्विक पदार्थ घेतले जातात.
- रुद्राभिषेक ः शिवलिंगावर जल, गंगाजल, दूध, दही, मध, तूप या पंचामृताने अभिषेक केला जातो. बेलपत्र, भस्म, धतुरा अर्पण केला जातो. ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप केला जातो. चार प्रहरांची पूजा करून संपूर्ण रात्र शिवजागर केला जातो. रात्रभर भजन, कीर्तन, ध्यान आणि मंत्रोच्चार केले जातात.
- विविध दृष्टिकोनातून महाशिवरात्री ः गृहस्थांसाठी शिव-पार्वती विवाहाचा उत्सव, काwटुंबिक एकतेचा दिवस. महत्त्वाकांक्षी व्यक्तींसाठी शिवाने अडथळ्यांवर मात केल्याचे प्रतीक. योगींसाठी निश्चलतेची, समाधीची आणि आत्मविलीनतेची रात्र. सामाजिक स्तरावर एकता, समता आणि सहअस्तित्वाचा संदेश.
- निसर्गाशी नाते ः शिवाला निसर्गदेवता मानले जाते. पूजेमध्ये वापरले जाणारे बेलपत्र, पाणी, भस्म ही निसर्गातूनच मिळणारी तत्त्वे आहेत. आजच्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री आपल्याला निसर्गरक्षणाचा संदेश देते.
- सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश ः महाशिवरात्री हा केवळ धार्मिक विधींचा सण नाही. तो आत्मशुद्धी, संयम, सहनशीलता आणि करुणा यांचा संदेश देतो. ध्यान, साधना आणि मंत्रजप यांद्वारे मन शांत होते. अज्ञानाचा अंधार दूर होतो. अंतर्मनातील गोंधळ निवळतो.
- जागरणातून जागृतीकडे ः महाशिवरात्री म्हणजे अंधारावर विजय नव्हे, तर अंधाराचे आकलन. ती शून्यतेची अनुभूती घेण्याची रात्र आहे. ही रात्र आपल्याला स्मरण करून देते की आपण केवळ शरीर आणि मन नाही; आपण त्या अमर्याद चेतनेचा अंश आहोत. रात्रभर जागून, ध्यान करून, मंत्रजप करून आपण स्वतःकडे परत येतो. महाशिवरात्री ही केवळ उत्सवाची रात्र नसून आत्मानुभूतीची संधी आहे. ही रात्र प्रत्येकासाठी केवळ ‘जागरण’ न ठरता ‘जागृती’ची रात्र ठरो, हीच प्रार्थना.

























































