
शेतकरी कुटुंब लग्नाला गेले असताना विनापरवाना त्यांच्या हद्दीत घुसून जमीन मोजणी करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांना अलिबागच्या म्हात्रोळी गावातील पाटील कुटुंबीयांनी अक्षरशः हुसकावून लावले. नार्वेकर यांच्यासोबत असलेल्या बगलबच्च्यांना ‘पुन्हा आमच्या शेतात पाय टाकाल तर खबरदार’ असा सज्जड दमच या शेतकरी कुटुंबाने दिला.
अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात सेजल शहा यांची अडीच एकर जागा आहे. ही जागा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खरेदी करायची असून त्याबाबतचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. या जागेची मोजणी करण्यासाठी राहुल नार्वेकर म्हात्रोळीत त्यांच्या साथीदारांसह पोहोचले. त्यांच्यासोबत जमीन मोजणी करणारे कर्मचारीही होते.
आम्ही लग्नाला गेल्याचा गैरफायदा घेता काय?
याची माहिती पाटील कुटुंबीयांना कळताच ते थेट त्यांच्या शेतात आले. नार्वेकर आणि त्यांच्या साथीदारांना मोजणी करताना पाहून त्यांच्या संतापाचा भडका उडाला. तुम्ही ज्या जागेत उभे आहात ती आमची आहे. विनापरवानगी आमच्या शेतात तुम्ही घुसखोरी का केली? आमच्या शेतात घुसून मोजणी करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्ही लग्नाला गेलो त्याचा गैरफायदा घेऊन आमच्या शेतात घुसता काय? असा संतप्त सवाल पाटील कुटुंबीयांनी केला. एका महिलेने तर नार्वेकर यांच्या साथीदारावर हात उगारला. त्यांचा रुद्रावतार पाहून नार्वेकरांसोबत असलेले साथीदार आणि मोजणी अधिकाऱ्यांनी तिथून काढता पाय घेतला. दरम्यान, जागेचे मालक रमेश पाटील यांनी हा आमचा काwटुंबीक वाद असून, नार्वेकरांच यांचा संबंध नसल्याचे सांगितले.
चतुःसीमेतील शेतकऱ्यांना नोटिसा दिल्याच नाहीत
जमीन मोजणी करण्यासाठी चतुःसीमेतील शेतकऱ्यांना आधी नोटिसा देऊन कळवावे लागते. त्यानुसार आजूबाजूच्या क्षेत्रातील शेतकरी उपस्थित राहतात. मात्र सेजल शहा यांच्या जमिनीची मोजणी करण्याआधी चतुःसीमेतील कोणत्याही शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत. उलट पाटील कुटुंबीयांच्या घरात लग्न होते. घरातील सगळी मंडळी हॉलवर असताना राहुल नार्वेकर, त्यांचे साथीदार आणि मोजणीचे अधिकारी त्यांच्या शेतात घुसले आणि मोजणी करू लागले.
त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही – राहुल नार्वेकर
मी परवा माझ्या शेतजमिनीवर जात असताना रस्त्यावर दोन शेतकऱ्यांमध्ये वाद होत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यावेळी मी फक्त त्यांना शांतपणे वाद मिटवण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर माझ्या कामानिमित्त पुढे निघून गेलो. सदर वाद किंवा त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे, तर संबंधित शेतकऱ्यांनीही या घटनेत नार्वेकरांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
जमिनीची मोजणी करताना लगतच्या जागामालकांना नोटिसा का दिल्या नाहीत? राहुल नार्वेकर हे आपल्या पदाचा गैरवापर करून सरकारी यंत्रणा चुकीच्या पद्धतीने का राबवताहेत, असा सवाल अलिबागवासीयांनी केला आहे.






























































