
गोरखनाथांची वाणी स्पष्टपणे सांगते की, जो योगी बनला आहे त्याने सत्तेपासून लांब राहिले पाहिजे. राजा योगी बनू शकतो, पण योगी पुन्हा राजा होऊ शकत नाही, तर प्रश्न असा आहे की, जर तुम्ही योगी असाल, अलिप्त असाल तर मुख्यमंत्री म्हणून सत्ता कशी स्वीकारत आहात, अशा शब्दांत शंकराचार्य स्वामी अविमुत्तेश्वरानंद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फटकारले. शंकराचार्य अविमुत्तेश्वरानंद यांच्या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी विधानसभेत आपले मत मांडले. प्रत्येक व्यक्ती शंकराचार्य असे लिहू शकत नाही. कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. मीसुद्धा नाही. माझे मत आहे की, भारतातील प्रत्येक व्यक्तीने कायद्याचे पालन केले पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. याबाबत वाराणसी येथे माध्यमांशी संवाद साधताना अविमुत्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार घेतला.


























































