मेट्रो कंत्राटदाराचा निष्काळजीपणा भोवला; चौकशीसाठी नेमली उच्चस्तरीय समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड पश्चिम येथे शनिवारी दुपारी चालती रिक्षा आणि कारवर मेट्रोचा अवाढव्य खांब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रामधन यादव असे मृताचे नाव आहे. या दुर्घटनेत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. एलबीएस मार्गावर ‘एमएमआरडीए’कडून मेट्रो-4 मार्गिकेचे काम सुरू असून निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. समितीच्या अहवालानंतर दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल.

मुलुंडच्या एलबीएस मार्गावरील जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीजवळ दुपारी 12.10 मिनिटांनी मेट्रो रेल्वेच्या खांबाचा भाग थेट खाली कोसळला. यावेळी नेहमीची वर्दळ सुरू असल्याने हे बांधकाम चालती रिक्षा आणि कारवर कोसळले. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह तीन पुरुष आणि एक महिला असे चार जण जखमी झाले. यात रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजकुमार यादव (45) यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तर महेंद्र यादव आणि आणि दीपा रुहिया (40) यांच्यावरही फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, या अपघाताला जबाबदार असलेले अधिकारी आणि कंत्राटदाराविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

परिसरात घबराट, प्रचंड वाहतूककोंडी

अचानक मेट्रोचा खांब रिक्षा आणि कारवर कोसळल्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. वाहने जागच्या जागी थांबली. त्यामुळे एलबीएस मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली.

मृताच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत

या दुर्घटनेत मृत पावलेल्या रामधन यादव यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

एलबीएस मार्गावरून प्रवास धोकादायक

मुलुंड येथे सुरू असलेल्या वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 मार्गिकेचे काम सुरू आहे. एलबीएस मार्गावरून ही रेल्वे जात आहे. त्यामुळे एलबीएस मार्गावरील प्रवास आता धोकादायक बनला आहे.

जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी

मुलुंडमधील एलबीएस रोडवर बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेने भाजपच्या विकासाची पोलखोल केली आहे. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरू असून स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. त्यामुळे तथाकथित विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.

55 ठिकाणी धोका

एलबीएस मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो-4 मार्गिकेच्या कामाची पाहणी सत्ताधारी पक्षाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी दहा दिवस आधीच एमएमआरडीए आणि पालिका अधिकाऱयांसह पाहणी करून 55 हून अधिक ठिकाणी कंत्राटदाराचा गंभीर निष्काळजीपणा निदर्शनास आणून दिला होता. याबाबत त्यांनी धोकादायक ठिकाणांची माहिती पालिका आणि एमएमआरडीएला फोटोसह देऊन धोका निदर्शनास आणून दिला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.