
राज्यातील शासकीय व खासगी कला संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे यासाठी राज्य कला प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. सुमारे 20 वर्षांनंतर सांगलीला या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण वारसा सांगणारे हे 65वे कला प्रदर्शन सांगलीच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून, ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
65वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) 16 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन आवार, सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी (16 रोजी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. सात दिवस चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीला वाव मिळावा यासाठी हे कला प्रदर्शन हक्काचे व्यासपीठ मानले जाते.
यंदा राज्यभरातून तीन हजार 490 विद्यार्थ्यांच्या एकूण पाच हजार 680 कलाकृती प्राप्त झाल्या असून, त्यांपैकी निवड समितीने एक हजार 275 उत्कृष्ट कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या प्रदर्शनादरम्यान ज्येष्ठ कलावंत जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक आणि शैक्षणिक योगदानाचा गौरव करीत राज्य शासनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव हे यंदाच्या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
प्रदर्शन एकूण आठ विभागांत असणार आहे. यामध्ये रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कलाशिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातुकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्र्ाकाम, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग यांचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड केली जाते. या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून तीन हजार 490 विद्यार्थ्यांच्या एकूण पाच हजार 680 कलाकृती प्राप्त झाल्या. प्राप्त कलाकृतींपैकी एक हजार 275 कलाकृतींची निवड प्रदर्शन समितीने केली आहे.
या व्यासपीठावर आता शासकीय रेखाकला परीक्षा (ग्रेड परीक्षा) आणि बालचित्रकला स्पर्धेतील गुणवंत शालेय विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील प्रथम प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण 10 आणि बालचित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील 16 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रथमच राज्य कला प्रदर्शनाच्या व्यासपीठावर केला जात आहे. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सहभागी करून घेण्याचा हा निर्णय कला क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
























































