
जालन्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री शाखेवर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे शटर तोडून रोख रकमेसह मुद्देमाल लंपास केला आहे. मात्र नेमका मुद्देमाल किती पळवला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळी पडलेले गॅसकटर,गॅसची टाकी तसेच सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. दरम्यान बँक फोडणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून 5 चोरटे पळताना या सीसीटीव्हीत दिसत आहे. तर बँकेच्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना चोरट्यांनी रुमालाने बांधून ठेवल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान बॅंकेतील किती रक्कम चोरीला गेली याचा तपास पोलीस करत आहेत.




























































