
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील नवीन व्यापार करारावर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या करारामुळे जम्मू-कश्मीरच्या कृषी क्षेत्रावर, विशेषतः फलोत्पादन आणि ड्राय फ्रूट्स व्यवसायावर गदा येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीनगरमधील ‘शेर-ए-काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा’त (SKUAST-K) आयोजित तीन दिवसीय ‘अॅग्री-टेक’ मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उमर अब्दुल्ला म्हणाले की, “या व्यापार करारामुळे देशात अमेरिकन कृषी उत्पादनांना शुल्कमुक्त (Duty-Free) प्रवेश मिळणार आहे. यात बदाम, अक्रोड आणि सफरचंद यांसारख्या फळांचा समावेश आहे, ज्यांचे उत्पादन आपण मोठ्या प्रमाणात करतो. सध्या तरी मला यात केवळ नुकसानच दिसत आहे.”
अमेरिकन उत्पादनांच्या तुलनेत हिंदुस्थानी उत्पादनांची गुणवत्ता कमी मानली जाईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “आमच्या शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांत पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. आता त्यांना सांगण्यात आले की, बाहेरून येणारा माल अधिक चांगला आहे, तर तो त्यांच्यावर अन्याय होईल.” मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी केंद्राला टोला लगावत म्हटले की, किमान सफरचंदासारख्या महत्त्वाच्या पिकाला तरी या करारातून वाचवायला हवे होते.
























































